
अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगभरात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अमेरिकेतही टॅरिफ धोरणांना विरोध होत आहे. या टॅरिफ धोरणाने ट्रम्प यांच्यावर टीका होत असतानाही त्यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता व्यापार करार पुढे रेटण्यासाठी आणि रशियावर दबाव टाकण्यासाठी हिंदुस्थान आणि चीनला धमक्या देत आहे. रशियाला चर्चेला आणण्यासाठीच हिंदुस्थानवर अतिरिक्त टॅरिफ लादल्याचे ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आता रशियाने अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.
हिंदुस्थान आणि चीनवर अमेरिकेच्या धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही. ते अमेरिकेच्या धमक्यांना जुमानणार नाहीत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेची दबावनीती यशस्वी होणार नाही. तसेच अमेरिकेच्या निर्बंधाचा रशियावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रशियाकडून तेल खरेदीच्या कारणस्तव अमेरिकेने हिंदुस्थानवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादला आहे. अमेरिका आणि जगभरातून यावर टीका करण्यात आली. मात्र, रशियाला चर्चेला आणण्यासाठीच हिंदुस्थानवर अतिरिक्त टॅरिफ लादण्यात आल्याचे ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, अमेरिकेची ही दबावनीती यशस्वी होणार नाही, असे सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.
लाव्ह्रोव्ह यांनी टॅरिफबाबतच्या अमेरिकेच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. अमेरिकेचा हिंदुस्थान आणि चीनवरील दबाव यशस्वी होणार नाही, हिंदुस्थान आणि चीनसारख्या प्राचीन संस्कृती अमेरिकेच्या अल्टिमेटमपुढे झुकणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रशियाच्या ‘द ग्रेट गेम’ कार्यक्रमात बोलताना लावरोव्ह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेने चीन आणि हिंदुस्थानसारख्या देशांना रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याची केलेली मागणी अयोग्य आहे. ती मागणी पूर्ण करून घेण्यासाठी अमेरिका दोन्ही देशांवर दबाव टाकत आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे रशियाने स्पष्ट केले.