
सामना प्रतिनिधी । शिरूर
तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांचा धुमाकूळ सुरु असून काल एकाच रात्री बिबट्यांच्या हल्ल्यात दोन शेळ्या, एक घोडे व पाळीव कुत्रा ठार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्याच्या पशचिमेकडील टाकळी हाजी, व मलठण येथे एकाच रात्री दोन ठिकाणी बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या, एक घोडे व पाळीव कुत्र्याला जीव गमवावा लागल्याने मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरीत पिंजरा लावावा अशी मागणी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे.
शुक्रवारी रात्री टाकळी हाजी मळगंगा पर्यटन स्थळा जवळ बारहाते वस्ती येथे मेंढ्यांना चारा उपलब्ध व्हावा म्हणुन कांदयांच्या शेतात मलठणच्या शिंदेवाडी येथील राजेंद्र भानु तिखोळे यांची बकरी शेतात रात्री बसण्यास होती. अचानक रात्री एकच्या सुमारास बिबट्यांने हल्ला करुन, एका शेळी ला जागीच ठार केले तर दुसरी एक शेळी घेऊन बिबट्या फरार झाला. त्यांच्यावर भुंकणाऱ्या पाळीव कुत्र्यालाही बिबट्याने पळवून नेले. वडील, पत्नीसह असलेले तिखोळे हे मेंढपाळ बिबट्यांच्या हल्याने घाबरले असून, शासनाकडुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. वनपाल एन एस चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
मलठण ता शिरुर येथील जबाजी रखमा तिखोले यांच्या शेतामधे बांधलेल्या घोडीवर देखील बिबट्याने हल्ला करून घोडी जागीच ठार केली आहे. या भागात मोठया प्रमानात ऊसाचे क्षेत्र असून, त्यामधे बिबट्याला आश्रय घेण्यासाठी मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. सध्या ऊस तोडणी सुरु असल्यामुळे बिबटे ऊसांच्या बाहेर येत आहेत.
सध्या दुष्काळाचे चटके जानवू लागल्याने, चारा टंचाई देखील मोठया प्रमाणात भासत आहे. त्यामुळे पारनेर व शिरूर तालुक्यातील मेंढपाळ चाऱ्यांच्या शोधात घोड व कुकडी नदी किनारी असणाऱ्या जुन्नर, शिरूर, पारनेर, आंबेगाव तालुक्यात ठिकठिकाणी शेतात राहात आहे. येथे कांदा व ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात असून, ऊसाच्याक्षेत्रा शेजारीच कांदा क्षेत्र असून, मेंढपाळ तेथेच तळ करून राहतात. त्यामुळे मोठया प्रमाणात पशुधनावर हल्ले होत आहेत. अनेक ठिकाणी हल्ले व नुकसान होऊनही अशिक्षित समाज वन अधिकाऱ्या पर्यंत न पोहचल्यांने शासनाकडून नुकसान भरपाई पासुन वंचीत राहात आहेत. वन विभागाकडून मेंढपाळांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार गावडे यांनी केली आहे.























































