गुंतवणूकदाराची फसवणूक प्रकरणी तिघांना अटक

दागिन्यांमध्ये गुंतवणुक केल्यास जास्त परतावा देतो असे सांगून शेकडो नागरिकांची फसवणूकप्रकरणी तिघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. कुशल दलपत सिह राठोड ऊर्फ कमलेश चौहान, विनायक माने, सिबाराम सावंत अशी त्या तिघांची नावे आहेत.

काही वर्षांपूर्वी राठोडने गोरेगाव पूर्वच्या संतोष नगर येथे श्री ज्वेलर्स नावाचे दुकान उघडले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने अनेक योजना सुरू केल्या होत्या. त्या योजनांना बळी पडून 2023 ते 2024 दरम्यान 90 हून अधिक जणांनी त्या योजनेत गुंतवणूक केली होती. दिवाळीत विशेष लॉटरीचे आयोजन करणार असल्याचे त्याने भूलथापा मारल्या होत्या. त्यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदार त्या दिवशी तेथे आले. तेव्हा ते दुकान बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ-12 च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे याच्या पथकातील उपनिरीक्षक अजित देसाई आदी पथकाने तपास करून आरोपींना अटक केली.