अफगाणी धर्मगुरुच्या हत्येतील आरोपी गजाआड; गावठी कट्टय़ांसह पाच जिवंत काडतुसे जप्त, तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावठी कट्टे बाळगणाऱया तिघांना राहुरी पोलिसांनी पकडले असून, त्यांच्याकडून पाच जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यांतील एक आरोपी येवला येथील अफगाणी मुस्लिम धर्मगुरूच्या हत्याप्रकरणातील संशयित आहे.

संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (वय 22, रा. समतानगर, कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (वय 26, रा. मालेगाव), विशाल सदानंद पिंगळे (वय 23, रा. कोपरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नगर-मनमाड राज्य महामार्गालगत राहुरी हद्दीत असलेल्या हॉटेल ‘सर्जा’ येथे बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संतोष ब्राह्मणे व त्याचे इतर दोन साथीदार जेवणासाठी बसले होते. ही खबर मिळताच श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी संतोष ब्राह्मणे याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व 500 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, गोपाल बोरगुले याच्याकडे पाच हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, विकास पिंगळे याच्याकडून 750 रुपये किमतीचे पिवळा धातूसदृश तीन जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावठी कट्टे व जिवंत काडतुसे कोठून व कोणासाठी आणली? याबाबत पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली. मात्र, या माहितीचा उलगडा होऊ शकला नाही. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध राहुरी पोलिसांत ‘आर्म्स ऍक्ट’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफगाणिस्तान येथील मुस्लिम धर्मगुरूच्या हत्येची घटना नाशिक जिह्यातील येवला हद्दीत घडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वळविण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून संतोष ब्राह्मणे हा येवला पोलिसांना हवा होता. मात्र, तो सापडत नव्हता. राहुरी हद्दीत गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सापडलेल्या ब्राह्मणेकडून नवीन उलगडा होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.