
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पाळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. तिघे भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यातील एकाचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
पाळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 26), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 26) व सुनील आप्पासाहेब जाधव (वय 18) हे तिघे भाऊ बुधवारी रात्री जेवण करून 8 वाजण्याच्या सुमारास शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले. पाणी देण्यासाठी एकाने विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विजेचा धक्का बसून तो विहिरीत कोसळला. इतर दोघांनी त्याला वाचविण्यासाठी लगेच विहिरीत उडी घेतली. मात्र तीनही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रात्री उशीर झाला तरी तिघे घरी परतले नाही म्हणून जाधव कुटुंबीय चिंतेत होते. मोबाईलवर केलेला कॉल उचलण्यात येत नव्हता.त्यांनी नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर मध्यरात्रीनंतर 2 वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर तिघेही विहिरीत बुडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून राजूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
आप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत. त्यापैकी ज्ञानेश्वरचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. इतर दोन मुले संभाजीनगर येथे कंपनीत काम करत होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ते घरी आले होते. तीन कर्त्या मुलांच्या मृत्यूने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.























































