
श्रीकांत सूर्यवंशी । जांब
आजी सासूचा अंत्यविधी उरकून तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोन जावई व मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.२८ सप्टेंबर रोजी साडेपाच वाजता घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही मुली एकाच दिवशी विधवा झाल्याने दैवज्ञ कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. दरम्यान, तलावातून त्या तिघांचे मृतदेह काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
जांब येथे विठ्ठल तुकाराम दैवज्ञ यांचे कुटुंब राहते. काही वर्षापूर्वी विठ्ठल दैवज्ञ यांचे निधन झाल्याने गावात त्यांची पत्नी एकटीच राहते. त्यांचा मुलगा कामासाठी बाहेरगावी राहतो. तर दोन मुलीचे लग्न झाल्याने त्यांच्या मुली सासरी राहतात. दरम्यान विठ्ठल दैवज्ञ यांच्या सासूबाई कोंडाबाई रत्नपारखी (७०) या जांब येथे राहणारी मुलगी अनुसयाबाई विठ्ठल दैवज्ञ यांच्याकडे वास्तव्यास होत्या. कोंडाबाई यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी दि.२७ सप्टेंबर रोजी रात्री निधन झाल्याने अनुसयाबाई यांचा मुलगा व दोन जावई, मुली अंत्यविधीसाठी जांब येथे शुक्रवारी सकाळी आले होते. आजी सासू कोंडाबाई यांच्यावर शुक्रवारी दुपारी चार वाजता अंत्यविधी आटोपून अनुसयाबाई यांचा मुलगा दत्ता विठ्ठल दैवज्ञ (१८) व जावई लक्ष्मण दिगंबर कौठकर (३५) रा.होट्टल ता.देगलूर व विशाल निवृत्ती सावळकर (२५) रा. आरळी ता.बिलोली हे जांब गावालगत तलावात आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने अनुसयाबाई यांचा मुलगा दत्ता दैवज्ञ, जानई लक्ष्मण कौठकर व विशाल सावळकर हे तिघे तलावात बुडून मृत्यू पावले.
ही घटना अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांनी सांगताच शिवसेनेचे श्यामसुंदर शिंदे, पंचायत समिती सदस्य मनोज गौंड, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णाराव शिंदे, पत्रकार श्रीकांत सूर्यवंशी, रमेश कठाळे, गजानन शिंदे, एस.बॉस मोरे, संग्राम मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान एकाचवेळी मुलगा व दोन जावई मृत्यू पावल्याने दैवज्ञ कुटुंबावर शोककळा पसरली. एकाच वेळी दोन्ही मुली विधवा झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.































































