अशा कर्जमाफीचा उपयोग काय? २४ तासात ३ शेतकऱ्यांनी मृत्युस कवटाळले

16

उदय जोशी । बीड

सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीचा उपायेग शेतकऱ्यांना झाला नाही हेच वारंवार स्पष्ट होत आहे. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आतमहत्येचे सत्र सुरूच आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्येच्या न थांबणाऱ्या या सत्रामुळे शेतकऱ्यांची कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत.

शेतीची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पाणीसंकट यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला खरा मात्र या कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबेना. बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिरूर तालुक्यातील शिंगारवाडी येथील विष्णु गंगाराम शिंगाडे (वय ४५ वर्षे) या शेतकऱ्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने कापूस फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी वैद्यकीय तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दुसरी घटना बोंडअळीचे अनुदान मिळण्यास उशीर होत असल्याने हतबल झालेल्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील रामा बबन तायडे (वय २७ वर्षे) याने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तर तिसरी घटना धारूर तालुक्यातील आम्ला लिमला येथे घडली आहे. तरूण शेतकरी मारोती सुजानराव काळे (वय १८) याने आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने बुधवारी सायंकाळी सात वाजता किटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या