कश्मीरमध्ये अतिरेक्यांशी धुमश्चक्री, महाराष्ट्राचे सुपुत्र सी. बी. भाकरे यांना वीरमरण

2833

सगळा देश कोरोना व्हायरसशी मुकाबला करत असताना जम्मू-कश्मिरात मात्र अतिरेक्यांनी सुरक्षा पथकावर तुफान गोळीबार केला. यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले असून त्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राचा समावेश आहे. या धुमश्चक्रीत सुरक्षा पथकाने जैश ए मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा केला.

उत्तर कश्मिरातील बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर येथे नूरबाग परिसरात जम्मू-कश्मीर पोलीस व सीआरपीएफचे संयुक्त पथक गस्तीवर असताना अहदबाब चेकपोस्टजवळ अतिरेक्यांनी या पथकाला निशाणा बनवले. अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या गाडीवर तुफान गोळीबार केला. यात हेड कॉन्स्टेबल राजीव शर्मा, कॉन्स्टेबल सी. बी. भाकरे तसेच कॉन्स्टेबल सत्पाल परमार हे तिघे शहीद झाले तर हेड कॉन्स्टेबल विश्वजीत घोष, गाडीचा चालक जावेद अहमद हे गंभीर जखमी झाले. जखमींना सोपोरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राजीव शर्मा हे बिहारमधील वैशालीचे असून भाकरे हे महाराष्ट्रातील बुलढाण्याचे तर परमार हे गुजरातेतील साबरकांठा येथील आहेत.

अतिरेक्यांनी गोळीबार करताच सुरक्षा पथकाने त्याला तडाखेबंद उत्तर दिले. या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला असून दोघेही जैश ए मोहम्मदचे असल्याचे कश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या