>> मंगेश मोरे
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयातील पूर्णपीठासोबतच सिंगापूरचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुंदरेश मेननही बसणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठा आरक्षणाची सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. दुपारी अडीच वाजता विशेष पूर्णपीठापुढे होणार मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील पूर्णपीठात न्यायमूर्ती मेनन यांचा अतिथी म्हणून सहभाग असणार आहे. सिंगापूर येथून सरन्यायाधीश मेनन यांच्यासह न्यायमूर्ती रमेश कन्नन, न्यायमूर्ती अँड्रे मणीअम हेसुद्धा उच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. भाऊसाहेब पवार, अॅड. संजित शुक्ला, जयश्री पाटील यांच्यासह अनुराधा पांडे, सीमा मंधानिया यांच्यातर्फे अॅड. अश्विन देशपांडे यांनी याचिका दाखल केली आहे.
मराठा आरक्षणाला विरोध तसेच आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या विविध याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला यांच्या पूर्णपीठापुढे एकत्रित सुनावणी सुरू आहे.