सतत वाहतुकीच्या वर्दळीने गजबजलेल्या शिवाजी विद्यापीठ परिसरातील सायबर चौकात एका भरधाव कारने तीन दुचाकींवरील 6 जणांना उडवल्याची थरकाप उडवणारी घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर इतर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात भरधाव कार उलटली असून यातील चालक वसंत चव्हाण (72) यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, चव्हाण यांना काही आजार होता का, याची चौकशी पोलीस करत आहेत. या अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे अद्यापपर्यंत समजली नाहीत.
कोल्हापुरातील सायबर चौकात दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून शिवाजी विद्यापीठाकडून सायबर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर एका चारचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. या भरधाव चारचाकीने तीन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीस्वार हे काही फूट अंतरावर जाऊन पडले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी असलेल्या तिघांवर सीपीआर रुग्णालयात आणि एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.