
वसई पूर्व भागातील कडघर या गावाकडे जाणारा पूल आज दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पूल कोसळल्यामुळे वडघर परिसरातील तीन गावांचा संपर्क तुटला आहे.
वडघर परिसतरात असलेल्या या पुलावरून जड आणि अवजड वाहने ये जा करीत होते. त्यामुळे हा पूल कमकुवत झाला होता. अखेर आज दुपारी तीनच्या सुमारास हा पूल कोसळला. ही घटना घडली त्यावेळी पुलावरून दोन वाहने जात होती. या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. हा पूल कोसळल्यामुळे मेढे, कडघर, कळभोण, लेंडी व या परिसरातील पाड्यांचा संपर्क तुटला आहे. या मार्गावर रोज होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे हा पूल पडला असून आमच्या गावातील गावकऱ्यांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झाला आहे. आता आम्हाला गणेशपुरीमार्गे वीस किलोमीटरचा प्रवास करून घरी यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया वडघरमधील रहिवाशी नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे.






























































