प्रसंगावधान दाखवत घरातल्या ज्येष्ठाने वाचविला कुटुंबाचा जीव, किरबेट ओझरवाडीतील थरारक घटना

 संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडीतील अशोक गंगाराम रवंदे यांनी घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून अख्या कुटुंबाला वाचविले यावेळी अशोक रवंदे (65) रा किरबेट ओझरवाडी हे आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास उठले व घराबाहेर गेले व त्याचवेळी बिबट्या घरात शिरला. मात्र रवंदे हे पुन्हा घरात आले व दरवाजा बंद केला त्यावेळी कुत्र्याचा आवाज आल्याने घरातील लाईट लावण्यात आली.

बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली असल्याचे रवंदे यांच्या निदर्शनास आले घराचे सर्व दरवाजे बंद असल्याने बिबट्याला घरातून बाहेर पडता येत नव्हते यात घरात भीतीचे व जीवघेणी परिस्थिती उद्भवली. अशावेळी घरात असणारे वयोवृद्ध गंगाराम सिताराम रवंदे (95) सुंदराबाई रामचंद्र रवंदे (60) अशोक गंगाराम रवंदे (65 ) शेवंती अशोक रवंदे (55 )यांची घालमेल सुरु झाली. आरडा ओरड झाली काय करायचे सुचेना हा सारा प्रकार अर्धा तास सुरु होता मात्र अशोक रवंदे (65) यांनी धाडस करून घराचा दरवाजा उघडला आणि बिबट्या पळून गेला जर दरवाजा उघडला नसता तर बिबटयाने अवघ्या कुटुंबावर हल्ला केला असता. बिबट्या ने हल्ला केलेला कुत्रा जखमी झाला असून त्याचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे.

रवंदे यांनी दाखवलेल्या धाडसाने कुटुंबातील कोणालाही दगाफटका न होता अक्षरशः सर्वांना वाचवले त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबतची कल्पना पोलीस पाटील प्रदीप अडबल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन रवंदे यांच्या कुटुंबाची विचारपूस केली व अशोक रवंदे यांच्या धाडसाचे कौतुक केले.