Tiago.ev- अर्ध्या तासाच्या चार्जिंगवर 110 किमी रेंज, टाटाच्या इलेक्ट्रिक हॅचबॅकची किंमत जाणून घ्या

टाटा मोटर्सने आकर्षक वैशिष्ट्यांसह आपली पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक कार हिंदुस्थानात लॉंच केली आहे. टाटाची एन्ट्री लेव्हल हॅचबॅक Tiago ही आता इलेक्ट्रिक स्वरूपात आली आहे. टाटाच्या EV कुटुंबात Tiago.ev ही आता नवीन कार लाँच करण्यात आली आहे. टाटाने Nexon EV आणि Tigor EV नंतर Tiago.ev ही कार परवडणाऱ्या दरात उपलब्ध केली आहे.

टाटाने Tiago.ev च्या पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी गाडीची किंमत 8.49 लाख ठेवली आहे. Tiago.ev ची बुकिंग 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. टाटा मोटर्सच्या अधिकृत डीलरशिप किंवा वेबसाइटवर 21 हजार रुपयांची बुकिंग रक्कम भरून ग्राहक कार बुक करू शकतात. जानेवारी 2023 पासून कारची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

सुलभ चार्जिंग पर्याय ऑफर करण्यासाठी, Tiago.ev चार वेगवेगळ्या चार्जिंग ऑपशन्ससह येते. 15A प्लग पॉईंट चार्जर चार्जिंगसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. 7.2KW AC होम फास्ट चार्जरने 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही गाडी 35 किमीची रेंज देते. तर 3 तास 36 मिनिटांत 10% ते 100% पर्यंत पूर्णपणे चार्ज होते. यात DC फास्ट चार्जिंग ऑपशन सुद्धा उपलब्ध आहे, जे फक्त 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 110 किमीची रेंज देते. या चार्जरच्या मदतीने ही कार केवळ 57 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.

Tiago.ev च्या चार्जिंग पर्यायांमध्ये 24 kWh बॅटरी पॅक समाविष्ट आहे, ज्यात 315 किमीची रेंज मिळते . तर 19.2 kWh बॅटरी पॅकच्या ऑपशन मध्ये 250 किमीची रेंज मिळते. Tiago.ev च्या बॅटरी आणि मोटरला टाटाकडून 8 वर्षे किंवा 1 लाख 60 हजार किमीची वॉरंटी मिळते .