
अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपुर
एकीकडे वाघांची वाढत चाललेली संख्या आणि दुसरीकडे मानवाचा जंगलातील हस्तक्षेप, यामुळं दोघांचाही जीव धोक्यात आल्याचं मागील दोन दिवसांतील घटनांवरून दिसून आलं. यावर आता कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी पुढे येत आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत एका शेतात जिवंत वीज प्रवाहामुळं एका तीन वर्षांच्या युवा पट्टेदार वाघाचा हकनाक मृत्यू झाला. मुळात या जंगल भागालगतच शेती आहे आणि यातील पीक वाचवण्यासाठी कुंपणाला वीजप्रवाह देण्यात येतो. यात केवळ वाघंच नाही, तर इतरही प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. वर्षभरापूर्वी अशीच घटना ताडोबालगत असलेल्या खडसंगी इथं घडली होती. तिथंही मोठा वाघ मरण पावला होता. वाघ केवळ याच कारणानं मरत नाहीत, तर शिकार किंवा घातपातानंही त्यांचे मृत्यू होत आहेत. या घटना टाळण्यासाठी वनविभागाकडे टायगर प्रोटेक्शन फोर्स आहे, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आहेत, कर्मचारी आहेत. एवढी मोठी यंत्रणा असतानाही वाघ मृत्यूमुखी पडत आहेत. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी मेलेल्या वाघाच्या गळ्यात तर कॉलर आयडी लावलेला होता. तरीही त्याच्यावर देखरेख ठेवण्यात वनविभाग अपयशी ठरला. हे कॉलर आयडी चोवीस तासात एकदाच लोकेशन देत असल्यानं त्याचा पाठलाग करणं कठीण आहे, असा युक्तिवाद वनविभागाचा आहे. त्यामुळं केवळ जनजागृती हाच एक मार्ग असल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे.
एकीकडे वाघ मरत असतानाच दुसरीकडे वाघाच्या हल्ल्यात माणसंही मारली जात आहेत. ताडोबाच्याच सीमेलगत असलेल्या रामदेगी या जंगलात वसलेल्या पर्यटनस्थळी मागील दोन दिवसांत दोन जणांचा बळी बिबट्यानं घेतला. मुळात माणसांचे मृत्यू हे जंगलातील हस्तक्षेपामुळं झाले आहेत. जंगल कमी होत चाललं आणि वाघांची संख्या वाढत चालली. या उलट्या गुणोत्तरामुळं या घटना घडत आहेत. तेंदूची पानं, जळाऊ लाकडं, मोहफूल यासाठी जंगलात घुसखोरी केली जात आहे. शिवाय जंगलालगत मोठ्या प्रमाणात शेती आहे. हे सर्व करीत असताना लोकं पाहिजे ती काळजी घेत नाही. त्यामुळं वन्यजीव हल्ला करीत असल्याचं दिसून आलं. मुळात आता चंद्रपूर जिल्ह्यात जेवढं जंगल आहे, ते सध्या असलेल्या वाघांसाठी पुरेसं नाही. त्यांची गर्दी झालेली आहे. लोकांचा जंगलातील शिरकाव वाढला आहे. त्यामुळं येथील वाघांना पकडून इतरत्र हलवणं, हा एक मार्ग वनविभागाकडे आहे. त्यावर अंमलबजावणी करण्याची आता वेळ आली आहे.
मागील वर्षभरातील घटनांतील माणसांचे आणि वाघांचे मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेली माणसं – 15
विविध कारणांनी मेलेले वाघ – 6 मोठे, 3पिल्लं
कॉलर आयडी असलेले वाघ – 2




























































