‘पळणार्‍या’ पेशंटमुळे आयसोलेशन सेंटरजवळ आता सिक्युरिटी ‘टाइट’;पीपीई किटसह दोन सुरक्षा रक्षक तैनात

710

कोरोनाच्या भितीने रुग्णालयातून ‘पळणार्‍या’ पेशंटमुळे प्रत्येक आयसोलेशन सेंटरबाहेर आता सिक्युरिटी ‘टाइट’ करण्यात येणार आहे. प्रत्येक आयसोलेशन सेंटरबाहेर पर्सनल प्रोटेक्टिव्ह किटसह दोन सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येत आहेत. 24 तास तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांकडून वॉर्डमधील रुग्णांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पालिका रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना पेशंट पळून जाणे, आत्महत्या करणे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनावर जोरदार टीकाही होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये आयसोलेशन सेंटरबाहेर आधी एकच सिक्युरिटी गार्ड असायचा. या ठिकाणी आता दोन सुरक्षा रक्षक ठेवले जात आहेत. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकाच्या अंगावर पीपीई किट असल्यामुळे कोरोना पेशंट पळाल्यास त्याला पकडू शकणार आहे. पीपीई किटमुळे कोरोनाचा धोका टळणार असल्याची माहिती सुरक्षा विभागाचे प्रमुख विनोद बाडकर यांनी दिली.

असे सुरू आहे काम
सध्या पालिकेची रुग्णालये, मुख्यालय, वॉर्ड ऑफिससह सुमारे 2400 कर्मचार्‍यांपैकी 1400 कर्मचारी 24 तास ऑनड्युटी असतात. पालिकेच्या कस्तुरबा, केईएम, नायर आदी रुग्णालयांच्या आयसोलेशन सेंटरजवळ पालिकेचे सिक्युरिटी गार्ड तैनात आहेत. या कर्मचार्‍यांना पीपीई किट घालून सलग आठ ते बारा तास ड्युटी करणे शक्य नसते. त्यामुळे आयसोलेशन सेंटर बाहेरील सुरक्षा रक्षकांची ड्युटी चार तासांनी बदलली जात आहे. जेणेकरून कर्मचारी सक्षमपणे काम करू शकत असल्याची माहिती सुरक्षा विभागाचे प्रमुख विनोद बाडकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या