टिकटॉकची विक्री होण्याची शक्यता, मायक्रोसॉफ्टला मिळाली खरेदीची ऑफर

893

हिंदुस्थाननंतर अमेरिका टिकटॉकवर बंदी घालणार असल्याने टिकटॉक अॅप्लिकेशनवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. आता टिकून राहण्यासाठी अॅप्लिकेशन स्वतःला चिनी कंपनीतून वगळण्याच्या विचारात असल्याचं वृत्त आहे. अॅप्लिकेशन विक्रीला काढल्यानंतर ही ऑफर मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीला मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानपाठोपाठ अमेरिकाही चिनी अॅप टिकटॉकवर बंदी घालणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनीच ही माहिती दिली आहे. टिकटॉकद्वारे चिनी गुप्तचर यंत्रणा माहिती गोळा करत असल्याचा संशय व्यक्त करत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर अनेक देश चीनवर नाराज असून त्यांनी चीनबाबत आता कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे या अॅपच्या वापरकर्त्यांमध्ये घट व्हायला लागली आहे. हे अॅप चिनी कंपनी बाईटडान्सचे असून जगभरात याचे असंख्य वापरकर्ते होते.

बाईटडान्स ही कंपनी मूळ चीनची असल्याने आता या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अॅप्लिकेशन विकण्याचा पर्याय निर्मात्यांकडे आहे. जगभरात असंख्य जणांकडे असलेल्या अॅप्लिकेशनमुळे निर्मात्यांना बराच फायदा होत होता. मात्र, ती गंगाजळी कोरोना महामारीनंतर चीनवरील बहिष्कारामुळे आटली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट हिचं नाव या खरेदीदारांच्या यादीच्या शक्यतेत सर्वात वर आहे. जर मायक्रोसॉफ्टने हे अॅप्लिकेशन विकत घेतलं तर बाईटडान्सचे अॅप्लिकेशनवरच सर्वाधिकार संपुष्टात येतील आणि सध्याची बंदीही उठू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हिंदुस्थानमध्ये टिकटॉक बंद
लडाख सीमेवर चिनी माकडांनी कुरापती सुरु केल्या होत्या. त्यांनी विश्वासघाताने हिंदुस्थानच्या 20 जवानांचे प्राण घेतले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि चीन देशांत कमालीचे तणावपूर्ण बनले होते आणि संघर्षमय वातावरण तयार झाले होते. शांततेच्या बैठका सुरू असतानाही चीनच्या कुरापती थांबल्या नव्हत्या.यामुळे गेल्या महिन्यात हिंदुस्थान सरकारने चीनला जोरदार झटका दिला आणि ‘टिकटॉक’सह अनेक अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या