‘टिकटॉक’ वर जुळले प्रेम; मुलगी समोर येताच प्रेमवीर भांबावला….

3338
tiktok-f

सध्या सगळीकडे ‘टिकटॉक’चा ट्रेंड आहे. अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण याचा वापर करतात. मात्र, याचा वापर केल्याने एक प्रेमवीर चक्क पोलीस ठाण्यात पोहचला आहे. ही घटना मुंबई आणि बनारसमधील आहे. ‘टिकटॉक’ वर एका मुलीचा व्हिडिओ आवडल्याने एका मुलाने तो लाइक केला. त्यानंतर ‘टिकटॉक’ लाइक करणे त्यांच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन आले.

मुंबईत राहणाऱ्या एका मुलीने स्वतःचा डान्सचा व्हिडीओ ‘टिकटॉक’ वर अपलोड केला होता. बनारसमध्ये राहणाऱ्या एका मुलाला ‘टिकटॉक’ व्हिडीओतील मुलगी खूप आवडली, व्हिडिओ बघितल्यापासून तो तिच्या प्रेमातच पडला. त्याने व्हिडिओला लाइक केले. त्यानंतर मुलीशी जवळीक वाढवण्यासाठी त्याने तिला दुसऱ्या सोशल मिडियावर इनव्हाइट केले. तिने त्याचे इनव्हिटेशन स्वीकारले आणि त्यांच्यात चॅटला सुरुवात झाली. या चॅटमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. सोशल मिडियावर प्रेमवीराने केलेल्या भूलथापांना मुलगी बळी पडली. त्यांच्यातील प्रेम फुलू लागले आणि मुलाला भेटण्याची आणि त्याची जीवनसाथी बनण्याची ओढ मुलीला लागली. त्यामुळे घरी कोणालाही न सांगता ती घरातून निघाली आणि थेट बनारस गाठले.

बनारसजवळील मंडुवाडीह स्थानकात पोहचून तिने मुलाला आपण त्याला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. तिच्या फोनमुळे तो मुलगा तिला भेटण्यासाठी मंडुवाडीह स्थानकात पोहचला. तेथे पोहचल्यावर ‘ दूरून डोंगर साजरे…’ याची प्रचिती मुलाला आली. व्हिडिओमध्ये आपल्याला भावलेली मुलगी हीच होती का असा प्रश्न त्याला पडला. व्हिडिओमध्ये फुलराणी आणि ड्रिमगर्ल भासणारी मुलगी प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा उंच आणि धिप्पाट होती. तिच्यासोबत आयुष्य कसे घालवायचे असा प्रश्न त्याला पडला. या घटनेने तो पुरसा भाबांवून गेला. मुलीने आपण तुझ्यासाठी घरदार आणि नातेवाइकांना सोडून आल्याचे तिने सांगितले. त्यामुळे मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काहीही ऐकण्यास तयार नव्हती. त्यामुळे त्याने तिच्यासह थेट मंडुवाडीह पोलीस ठाणे गाठले आणि प्रेमवीराच्या भूमिकेतून बाहेर पडत आपली चूक कबूल करत त्याने पोलिसांना सत्य सांगितले. आता या प्रकरणी पोलीस काय निर्णय घेणार यावरच त्यांच्या आयुष्याचा फैसला होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या