टिळक आणि रे रोड उड्डाणपुलाच्या डिझाईनला पालिका आणि रेल्वेची मंजुरी

मुंबईतील रेल्वे हद्दीतील धोकादायक ठरविण्यात आलेल्या उड्डाणपुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल्वे पायाभूत विकास महामंडळ (एमआरआयडीसी) करीत आहे. यापैकी दादरच्या टिळक पूल आणि रे रोड पुलाच्या डिझाईनला पालिका आणि रेल्वेने मंजुरी दिली आहे. या पुलावरील केबल व इतर वाहिन्यांचा भार कमी करण्याचे काम सध्या सुरू असून मान्सून संपताच प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार आहे.

3 जुलै 2018 रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरीजवळ गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका कोसळून मोठा अपघात झाला होता. त्यानंतर मुंबईतील सर्व पुलांची सुरक्षा तपासणी मुंबई आयआयटीच्या तज्ञांनी केली होती. त्यात रेल्वे मार्गावरील हे ब्रिटिशकालीन पूल धोकादायक ठरविण्यात आले आहेत. त्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ येथील उड्डाणपूल तातडीने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुलाचे बांधकाम पश्चिम रेल्वेमार्फत अजूनही सुरू आहे. 2024 पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली आहे.

मुंबईतील रेल्वे हद्दीतील पालिकेच्या पुलाच्या बांधणीवरून रेल्वे आणि पालिकेत वाद निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र रेल्वे पायाभूत विकास महामंडळ (एमआरआयडीसी) या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था पालिका आणि एमएमआरडीएच्या मदतीने मुंबईतील रेल्वे हद्दीतील धोकादायक ठरविण्यात आलेल्या उड्डाणपुलांची बांधणी करणार आहे. टिळक आणि रे रोड पुलाच्या बरोबरच भायखळा, ओलिवंट (माझगाव), महालक्ष्मी, आर्थर, घाटकोपर, बेलासिस (मुंबई सेंट्रल), गार्डन (एस ब्रिज), करी रोड आदी 11 उड्डाणपुलांची उभारणी करणार आहे. या पुलांपैकी आणखी तीन पुलांचे डिझाईन मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या पुलांचे काम नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू होणार आहे. इतर पुलाच्या डिझाईन मंजुरीचे काम वेगाने सुरू आहे. याबाबत पालिका आणि रेल्वेचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे ‘एमआरआयडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या