परीक्षांचे दिवस

ias-exams-bta1
प्रातिनिधिक फोटो

 सामना प्रतिनिधी । मुंबई
सध्या परीक्षांचे दिवस सुरू झाले आहेत. या परीक्षा म्हणजे आपल्या आवडत्या वाटा शोधण्याचे प्रवेशद्वार. जीवनमरणाचा प्रश्न नव्हे. उगीचच अवघड वाटणाऱया या परीक्षा आणि हे परीक्षांचे दिवस सुलभ करण्यात आम्हीही तुमची थोडी मदत करतो आहोत.

पेपर सोप्पा गेल्यास…
– पेपर सोपा गेला तरी हुरळून जाऊ नका. बाकीच्या विषयांची तयारी करायची आहे हे लक्षात घ्या. मन शांत ठेवा.
– सगळ्या पेपरांची तयारी एकसारखीच असली पाहिजे.
– झालेल्या पेपरविषयी कुणाशीच अतिचर्चा करणं टाळा. आधीचा पेपर सोपा गेलाय याचा परिणाम इतर पेपरांवर होता कामा नये हे लक्षात ठेवायचे.
– प्रत्येक विषयाची अगदी शांत डोक्याने पुन्हा उजळणी करा. प्रत्येक पेपरच्या अभ्यासाला फ्रेश मनाने लागा. उगीचच दिवास्वप्नात रमू नका. माझा अभ्यास झालाय म्हणून फार वेळ ब्रेक घेऊ नका. अभ्यास झाला असला तरी वेगवेगळे प्रश्नही हाताळून पाहा.

पेपर कठीण गेल्यास…
– आपण खूप अभ्यास केला, पण पेपरमध्ये भलतेच प्रश्न आले म्हणून पेपर कठीण गेला, अशी वेळ येऊ शकते. पण काही हरकत नाही. अशावेळी कोण काय म्हणेल हा विचार मनात आणू नका. शक्यतो शांत राहा. पुढच्या पेपरमध्ये जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा.

– एक पेपर झाला आणि दुसऱया दिवशी सुट्टी असेल तर संध्याकाळी मस्त सायकलिंग करा, खेळा. परीक्षा सुरू झाली आहे. आता अभ्यासात बुडायचे नाही. पेपरच्या दिवशी फक्त उजळणी करा.

– पेपर कठीण गेला म्हणून उगाचच टेन्शन घेऊ नका. कारण झाले ते झाले. झालेल्या विषयाचा विचार करून नंतरच्या पेपरवर का परिणाम करायचा? आता राहिलेल्या विषयात जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. नंतरच्या विषयांमधले अवघड प्रश्नांची यादी करून त्यावर काम करा. आत्मविश्वासाने दुसऱया पेपरच्या अभ्यासाला लागा.

– धडा किंवा गणितातलं एखादं प्रकरण गाळलं असेल तरी त्यातले पर्यायी प्रश्न सोडवता येतात. त्यावर भर द्या. आकृती, नकाशे किंवा इतर छोटय़ा प्रश्नांचे गुण हमखास मिळतात त्याचा नीट अभ्यास करा.

– वेळेचं नीट नियोजन करून प्रत्येक विषयाला वेळ द्या. सोपे सोपे प्रश्न पाठ करून ते लिहून काढण्यावर भर द्या. जे अवघड वाटतयं त्याच्याकडे अगदी शेवटी लक्ष द्या. ती प्रकरणं समजून घेण्याचा प्रयत्न करा.

परीक्षेला निघाल तेव्हा…
– पेपर द्यायला निघाल तेव्हा सर्व साहित्य आहे ना याची खात्री करून घ्या. ओळखपत्र, हॉलतिकीट, पेन (किमान तीन), पेन्सिल, टोक काढायचे शार्पनर, पट्टी, लॉगरिथम, कंपास बॉक्स, खोडरबर, पॅड, पाण्याची बाटली, रुमाल, घडय़ाळ, काही पैसेही जवळ ठेवा

– हलका आहार घ्यावा. (साधी पोळी, भाजी, करण-भात). पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.

– रस्त्यातील वाहतूक, ट्रॅफिक जॅमचा विचार करुन योग्य वेळेत निघा. सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल वा टोपी वापरा. मोटरसायकलने जाल तर हेल्मेट अवश्य घाला. परीक्षेच्या अर्धा तास सेंटरवर पोहोचा.

हेही महत्त्वाचे…
– योग्य आहार आणि ठरावीक झोप परीक्षेच्या काळात घ्यायलाच हवी. कारण आता ताण घ्यायचा नाही. केवळ आहे तोच अभ्यास पक्का करण्यासाठी उजळणी करायची.
– हलका व्यायामही घ्या. चालायला जा. उन्हात जास्त फिरू नका आणि महत्त्वाचे म्हणजे बाहेरचे चमचमीत, तिखट पदार्थ परीक्षेच्या दिवसांमध्ये जरा टाळाच. आहार साधाच घ्या.
– परीक्षा आली की पोटदुखी, डोकेदुखी सुरू होते. असं होऊ नये यासाठी आधीच फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या. शिक्षकांच्या संपर्कात राहा. मनोबल वाढेल.
– घरातल्या मोठय़ांपासून काहीही लपवू नका. त्यांच्याजवळ प्रांजळपणे सर्व बोला.
– हे दिवस मनन, चिंतन याचे आहेत. त्यामुळे त्यावरच अधिक भर द्या.
– जबाबदारी परीक्षेची आहे, पण विनाकारण दडपण घेऊ नका. स्वतःची काळजी घ्या आणि छान पेपर लिहा. परीक्षा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न नाही. या परीक्षांमधून, अभ्यासातून तुम्हाला स्वतःला काय आवडतं याचा शोध घ्या. आपले ध्येय निश्चित करा.

पालक व शिक्षकांसाठी…
– झालेल्या पेपरवर मुलांशी चर्चा करु नका.
– मुलांशी आवश्यक तो संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवायला त्यांना मदत करा.
– अभ्यासाला पोषक वातावरण राहील याचा प्रयत्न करा. मुलांना त्यांच्या प्रगतीबद्दल व त्यांच्यातील बदलाबद्दल प्रोत्साहन द्या.
– मुलांनाही विचार करता येतो. त्यांनाही त्यांची मतं असतात याचं भान ठेवा. मुलांच्या चांगुलपणावर मनःपूर्वक विश्वास ठेवा.
– अभ्यासाबाबत मुलांना सतत भंडावून सोडू नका. इतरांशी मुलाची तुलना करु नका.

आपली प्रतिक्रिया द्या