आम्ही Bikers

170

>> छाया मोरे  

कामाची वेळ गाठणे ही आजच्या गर्दीच्या वेळेत खर्‍या अर्थाने कसरत असते. ट्रेन, बसने हे शक्य होतेच असे नाही. स्वतःची छोटीशी गाडी किंवा दुचाकी असणं अशावेळी बहुतेक स्त्रियांच्या दृष्टीने सोयीचे पडते. स्कुटी, ऑक्टिव्हा खास स्त्रियांसाठी असा शिक्का बसलेल्या दुचाकी. पण आजची सक्षम महिला अगदी रॉयल एनफिल्डही सहज चालवू शकते.  

शिकण्याची जिद्द, सराव आणि आवड असेल तर कुठलीही दुचाकी चालवणे मुलींसाठी कठीण नाही. आज बर्‍याच मुली मोटरसायकल अगदी सराईतपणे चालवतात. जाणून घेऊया…

मुली मुलांएवढ्या चांगल्या बाईक चालवू शकत नाहीत असा अनेकांचा गैरसमज आहे. कारण आजपर्यंत आपण मुलींना फक्त स्कूटी चालवताना बघितले आहे. मात्र आता अनेक मुली सहजतेने बाईक चालवतात. सध्या हिंदुस्थानी बाजारपेठेत ऑक्टिवा, ऍक्सेस, दुरो आणि डिओ यांसारख्या दुचाकी मुलींसाठी डिझाइन करुन लॉन्च केल्या आहेत.  हिरो, टीव्हीएस आणि होंडासारख्या टुव्हीलरच्या कंपन्यांनी महिलांसाठी कमीतकमी वजनाच्या बाईक लॉन्च केल्या आहेत. दुचाकी मार्केटमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. बाजारात दररोज एक नवीन दुचाकी दिसून येते. या दुचाकींची वैशिष्ट्यै म्हणजे त्यांचे तपशील आणि त्यांची रचना ही हिंदुस्थानी रस्त्यांनुसार डिझाइन केलेली असून नोकरदार महिला, कॉलेज तरुणी आणि गृहिणी यांच्या दृष्टीने या डिझाईन केल्या आहेत. जेणेकरून ते त्यांच्या कामासाठी स्वतंत्रपणे या दुचाकी घेऊन जाऊ शकतात. या दुचाकी हिंदुस्थानी स्त्रियांसाठी उपयुक्त आहेत.

वजनदार मोटारसायकल चालवणे शक्य

ही बाईक चालवणं फार कठीण असल्यामुळे ती केवळ मुलेच चालवू शकतात असा आपल्याकडे गैरसमज आहे. आर्थिकदृष्ट्या ज्यांना शक्य आहे आणि ज्या बाईकचं वजनही पेलू शकतात अशा मुली आत्मविश्वासाने ही बाईक चालवू शकतात आणि चालवतात. ही बाईक अन्य बाईकपेक्षा वजनाने जड असते. फक्त वेगावर नियंत्रण असायला हवे. या बाईकचे ब्रेक उत्तम असतात.

 • मोटरसायकल आणि स्कूटरचे बरेच प्रकार आहेत. कुठलीही दुचाकी घेताना तुम्हाला कम्फर्ट महत्त्वाचा असतो.
 • बाईक चालवणं जितकं सहज होईल, तितका त्याचा अधिक आनंद घेता येतो.
 • आज अनेक मुली मोटरसायकलने दूरच्या प्रवासाला जातात क आपला प्रवास सुरक्षित पूर्णसुद्धा करतात.
 • सगळ्यात आधी वाहतुकीचे नियम पाळावेत. हेल्मेट नियमित वापरावे आणि हायवेवरून गाडी चालवताना आपली लेन मेण्टेन करणं फार महत्त्वाचे आहे.
 • पडणं आपल्या हातात नसतं, पण पडू नये म्हणून गाडी चालवताना सतर्कतेने चालवणे, वेळेत ब्रेकचा वापर करणे.. समोर तेल पडले असल्यास तोल सांभाळणे या गोष्टी लक्षात ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पूर्ण सराव झाल्याशिवाय गाडी चालवू नये.
 • बाईक चालवताना पडल्यावर आपण स्वतःची मदत करू शकत नाही पण अशावेळी कुठलाही संकोच न बाळगता आजुबाजूच्या लोकांची मदत घ्यावी.
 • कुठलीही दुचाकी चालवताना तुम्ही नेमके कुठे चालवता त्यावर अवलंबून असतं. तुम्ही गर्दीच्या रस्त्यावर चालवताय तर 20पर्यंत आणि जर हायवेवर चालवताय तर कमीतकमी 40चा वेग असावा.
 • पार्किंग करताना दुचाकी रोड फेसिंग असावी, कारण ती दुचाकी बाहेर काढताना स्त्रियांना अवघड जाणार नाही.
 • वेळोवेळी मेण्टेनन्स करणं, दुचाकीचे बाहेरचे सौंदर्य टिकवण्यासाठी ती नेहमी पुसून ठेवणे, वरचेवर ब्रेक तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
 • साधारणपणे सगळ्या दुचाकी पन्नासच्या वर असतात. सगळ्यात स्वस्त म्हणाल तर स्कूटी आहे. सगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले गेले तर ऑक्टिवा, ऍक्सेस आहे. अशा बाईक्स जास्त चांगल्या आहेत.
 • बाईक चालवताना मुलींनी कम्फर्टेबल कपडे घालावेत. ट्राऊझर, जीन्स घालावी. पंजाबी ड्रेस, कुर्तीवर स्कार्फ घेत असाल तर नीट बांधून घेणे गरजेचे आहे.
 • दुचाकी चालवताना डोळ्यावर गॉगल लावावा आणि सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी तोंडाला स्कार्फ बांधावा. तसेच अंगाला सनस्क्रीन लावून बाहेर पडावे.
 • प्रत्येक दुचाकी चालवणारीने योगा, सूर्यनमस्कार नियमित केल्यास त्यांना शारीरिक समस्या येणार नाहीत.

लेखिका सुरभी स्कूटर ट्रेनिंग क्लासेसच्या संचालिका आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या