
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेली डबलडेकर बस अखेर ठाण्यात दाखल झाली आहे. टीएमटीच्या इतिहासात प्रथमच एसी डबलडेकर बस धावणार आहे. येत्या सहा महिन्यांत एकूण दहा बस ताफ्यात दाखल होणार असून ठाणेकरांना एसी सेवा मिळणार आहे. आज महाराष्ट्र दिनी नव्या आकर्षक डबलडेकर बसचे अनौपचारिक उद्घाटन झाले. आठ ते दहा दिवसांतच प्रत्यक्ष घोडबंदर रोडवर ही बस मोठ्या प्रमाणात धावताना दिसणार आहे. एसी डबलडेकर बसमुळे ठाणे परिवहनच्या उत्पन्नातदेखील भर पडणार आहे.
सध्या टीएमटीच्या ताफ्यात 407 बस असून प्रत्यक्ष 380 बस सेवा देत आहेत. परिवहनचे रोजचे उत्पन्न अंदाजे 16 ते 17 लाख रुपये एवढे आहे. अनेक दिवसांपासून ठाण्यात मुंबईप्रमाणे डबलडेकर बस येणार असल्याची चर्चा सुरू होती. आरटीओमार्फत या बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली असून सेवेसाठी आवश्यक असलेली औपचारिकताही पूर्ण झाली असल्याची माहिती परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बोहरे यांनी दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज डबलडेकर बसचे उद्घाटन करण्यात आले.
नवीन डबलडेकर बस पूर्णपणे वातानुकूलित असून खाली 36 व वर 29 एवढ्या सीट्स आहेत. प्रवाशांची एकूण क्षमता 65 एवढी आहे.
या बसमध्ये चढण्यासाठी दोन व उतरवण्यासाठी दोन दरवाजे असल्याने गर्दी होणार नाही.
डबलडेकर बसमधील प्रत्येक आसनामागे मोबाईल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
बसेसचे परिचलन सिटी लाईफलाइन ट्रॅव्हल्स प्रा. लि. या कंपनीमार्फत होणार आहे. बसेसची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीचा भारही कंपनीवर राहील.



























































