टोकियो ऑलिम्पिकचा मार्ग खडतर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांचा दौरा रद्द

जपानमधील कोरोनाची वाढ व आणीबाणीची परिस्थिती यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांचा पुढील सोमवारी आयोजित करण्यात येणारा जपान दौरा तूर्त तरी रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती ऑलिम्पिक आयोजन समितीकडून सोमवारी देण्यात आली. थॉमस बाक यांचा दौरा रद्द झाल्यामुळे या वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत जपानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दहा आठवडे आधी धक्का

टोकियो ऑलिम्पिकची आयोजन समिती व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून सातत्याने हा क्रीडा महोत्सव यशस्वीपणे पार पडणार असे सांगण्यात येत आहे. जपानमधील जनतेकडून मात्र टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाला कडाडून विरोध करण्यात येत आहे. आणि आता ऑलिम्पिक सुरू होण्याच्या दहा आठवडे आधीच थॉमस बाक यांचा दौरा रद्द झाल्यामुळे आता आयोजन समिती व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला मोठा धक्का बसला आहे.

ऑलिम्पिकपेक्षा जनतेचे प्राण व उदरनिर्वाह महत्त्वाचा

जपानमधील विरोधी पक्षाचे नेते युकीओ इदानो यावेळी म्हणाले की, सध्या जपानमधील परिस्थिती बिकट आहे. जनतेचे प्राण वाचवणे आणि त्यांचा उदरनिर्वाह करणे ऑलिम्पिक आयोजनापेक्षा महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, प्रत्यक्षात टोकियो ऑलिम्पिक अद्याप रद्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी काळ ऑलिम्पिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

‘बीसीसीआय’ व ईसीबी यांच्यात लसीसंदर्भात चर्चा सुरू

इंग्लंड दौऱयापूर्वी ‘टीम इंडिया’तील सर्व क्रिकेटपटूंना कोराना लस देण्याची आमची योजना असल्याची माहिती ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱयाने नुकतीच दिली होती. यासंदर्भात ‘बीसीसीआय’ची सध्या इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्याशी चर्चा सुरू आहे. ‘ईसीबी’ने हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी दाखविली तर मग काही अडचण असणार नाही. मात्र, इंग्लंड सरकारकडून तशी परवानगी न मिळाल्यास आम्ही दुसरा डोस हिंदुस्थानातूनच इंग्लंडला घेऊन जाऊ, अशी ‘बीसीसीआय’ची योजना असल्याचेही अधिकाऱयाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या