टोकियो ऑलिम्पिक – अर्जुन-अरविंद जोडीची उपांत्य फेरीत धडक

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंगमध्ये हिंदुस्थानसाठी रविवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग या जोडीने  लाइटवेट डबलस्कल्स स्पर्धेतील रेपेशाज फेरीत तिसरे स्थान मिळवले आणि उपांत्य फेरीत धडक दिली. उपांत्य फेरी 27 जुलै रोजी होणार आहे.

जी साथियानला पराभवाचा धक्का

हिंदुस्थानच्या ज्ञानशेखरन साथियानला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये सात गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभवाचा धक्का बसला. पुरुष गटाच्या दुसऱ्या फेरीत हाँगकाँगच्या लाम सियू हांग याने या थरारक लढतीत 11-7, 7-11, 4-11, 5-11, 11-9, 12-10, 11-6 अशी बाजी मारली.

जिम्नॅस्टिकमध्ये प्रणती नायकची अपयशी झुंज

प्रणती नायक टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली हिंदुस्थानची एकमेव जिम्नास्ट होती. मात्र, कलात्मक जिम्नॅटिक्स स्पर्धेत तिला ऑलराउंड फायनल्समध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले.

सानियाअंकिता जोडी सलामीलाच गारद

सानिया मिर्झा आणि अंकिता रैना ही हिंदुस्थानी जोडी टोकियो ऑलिम्पिकमधील टेनिसच्या महिला दुहेरीत सलामीलाच गारद झाली. युव्रेनची नादिया व लियुडमाइला या किचेनोक भगिनींनी हिंदुस्थानी जोडीचा 2-1 फरकाने पराभव केला.

बॉक्सिंगमध्ये निराशा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या पुरुष गटात शनिवारी विकास कृष्णनचा पराभव झाल्यानंतर रविवारी मनीष काwशिकनेही निराशा केली. ब्रिटनच्या ल्यूक मॅककॉर्मेकने सलामीच्या लढतीत मनीषला लाइटवेट 63 किलो गटात 4-1 गुण फरकाने धूळ चारली.

हॉकीमध्ये धुव्वा

हिंदुस्थानच्या पुरुषांच्या हॉकी संघाला रविवारी निराशेचा सामना करावा लागला. बलाढय़ ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 7-1 अशा फरकाने धुव्वा उडवला.

माना पटेल, श्रीहरी नटराज यांचे आव्हान संपुष्टात

माना पटेल व श्रीहरी नटराज या हिंदुस्थानी जलतरणपटूंचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान रविवारीच संपुष्टात आले. दोघांनाही उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या दोघांनाही 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरीही करता आली नाही. श्रीहरी पुरुषांच्या बॅक स्ट्रोक हिटमध्ये 54.31 सेपंद वेळेसह सहाव्या स्थानी राहिला. त्याची सर्वोत्तम वेळ आहे. 53.77. एकूण 40 जलतरणपटूंमध्ये श्रीहरी 27 व्या स्थानी राहिला. माना पटेल महिलांच्या बॅक स्ट्रोक हिटमध्ये 1 मिनीट 5.20 सेपंद वेळेसह दुसऱ्या स्थानी राहिली. मात्र, एकूण स्पर्धकांमध्ये ती 39व्या स्थानावर फेकली गेली.

आपली प्रतिक्रिया द्या