शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधायचाय! कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे ध्येय

328

राष्ट्रीय स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ स्पर्धा यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या मराठमोळ्या खेळाडूला गेल्या दोन वर्षांमध्ये ठसा उमटवता आलेला नाही, पण आता ही निराशा मागे टाकून त्याला शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधायचाय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून महाराष्ट्रासह देशाचा झेंडा दिमाखात फडकवायचाय. हेच ध्येय आता त्याने डोळ्यांसमोर ठेवले आहे. याप्रसंगी दैनिक ‘सामना’शी त्याने केलेली ही खास बातचित.

लॉकडाऊनमध्ये प्रॉपर सराव करायला मिळाला नाही

18 मार्च रोजी नवी दिल्ली येथून पुण्याला आलो. त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यामुळे तिथपासून कोल्हापूर येथील घरीच राहावे लागले. याचदरम्यान माझे नेमबाजीचे सर्व साहित्य पुण्यामध्येच राहिले. त्यामुळे फिजिकल फिटनेसवर जास्त लक्ष देता आले नाही. तसेच गावामध्ये मोबाईलला ‘रेंज’ मिळत नसल्यामुळे ऑनलाइन सरावापासून दूरच राहिलो. काही कालावधीनंतर पुण्यामध्ये जाऊन रायफल घेऊन आलो. तिथपासून रायफलसह ‘होल्ंिडग’चा सराव केला. स्टॅमिना वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा व्यायाम होता, असे स्वप्नील कुसाळे पुढे सांगतो.

नेमबाजीत चढाओढ वाढलीय

सध्या हिंदुस्थानात नेमबाजीसाठी उत्तम स्थिती आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चढाओढ होताना दिसत आहे. स्पर्धांमध्ये अधिकाधिक स्कोअर करणाऱया खेळाडूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे चुरसही वाढू लागली आहे. मात्र हा खेळ तसा महागडा आहे. बंदूक, गोळ्या, प्रशिक्षक, डाएट, फिटनेससाठी प्रचंड पैसा लागतो. लहान गावातील खेळाडूला या खेळात करीअर करायचे असल्यास सुरुवातीला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टर, सरकार, संघटना यांसारख्या इतर महत्त्वाच्या घटकांनी याकडे लक्ष देऊन मार्ग काढायला हवा, असे स्वप्नील कुसाळे यावेळी सांगतो.

… म्हणून प्रमोशन थांबलेय

आतापर्यंतच्या कारकीर्दीत मला रेल्वे, साई, संघटना, पर्सनल कोच दीपाली देशपांडे आणि लक्ष्य संस्था यांच्याकडून मोलाची मदत लाभलीय. मात्र गेल्या सहा वर्षांमध्ये भुसावळला जाऊन ट्रेनिंग पूर्ण करता आले नसल्यामुळे माझे प्रमोशन थांबलेय अशी खंतही पुढे स्वप्नील कुसाळे याने व्यक्त केली. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये रायफलच्या बिघाडामुळे चांगली कामगिरी करता आली नसल्याचे त्याने यावेळी बोलून दाखवले.

… अन् सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरीला लागलो

क्रीडा प्रबोधिनीत पहिल्या वर्षी फिजिकल फिटनेसवर लक्ष दिले. दुसऱ्या वर्षी खेळ निवडण्याची मुभा दिली. मी नेमबाजीची निवड केली. त्यानंतर नवनाथ फडतरे यांनी माझी परीक्षा घेतली. पासही झालो. कोल्हापूर व पुण्याला शिकण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे नाशिक येथील ऍकॅडमीत प्रवेश घेतला. विश्वजित शिंदे व नानासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे कसब आत्मसात केले. युथ ऑलिम्पिक स्पर्धा निरखून पाहिली अन् त्यानंतर या खेळामध्येच करीअर करण्याचा निर्णय घेतला. ज्युनियर स्तरावर चांगली कामगिरी करता आली. अखेर 2015 साली सेंट्रल रेल्वेकडून नोकरीचा प्रस्ताव आला. ‘टीसी’ म्हणून मी सेंट्रल रेल्वेत नोकरीला लागलो, असे स्वप्नील कुसाळे आवर्जून नमूद करतो.

आपली प्रतिक्रिया द्या