कडक निर्बंधांमुळे जनतेमध्ये नाराजी, टोकियो ऑलिम्पिकचे पडघम

टोकियो ऑलिम्पिकचा धमाका 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानी सरकारकडून 22 ऑगस्टपर्यंत आणीबाणीही लागू करण्यात आलेली आहे. जगभरातून येणाऱया खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पदाधिकाऱयांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी कडक नियमांचाही अवलंब करण्यात आलेला आहे. जपानमधील बार व रेस्टॉरंट यासाठी रात्री आठ वाजताची डेडलाईन ठेवण्यात आलेली आहे. यामुळे मात्र जपानमधील जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन नियम तोडला जात आहे. यावर आता जपानी सरकार कोणते पाऊल उचलतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

ऑलिम्पिक व्हायला नको होते!

याप्रसंगी रियल इस्टेट येथे नोकरी करणारे मियो मारुयामा म्हणाले, कोरोनाचा संसर्ग देशात वाढत आहे. यानंतरही जपानी सरकारने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे नागरिकांना धक्काच बसला आहे. या वर्षी टोकियो ऑलिम्पिक व्हायला नको होते.

मागील तीन दिवस रस्त्यांवरच मजा

जपानमधील बहुतांशी शहरांमध्ये रात्री आठनंतर बार व रेस्टॉरंट बंद केले जात आहेत. त्यामुळे येथील जनता ग्रुपमध्ये रस्त्यांवरच बसून दारू पीत आहेत. सर्वच ठिकाणी नियमांचा भंग केला जात आहे. मागील तीन दिवस याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

नेत्यांची वचनं आणि कार्यामध्ये फरक

जपानमधील नेत्यांची वचनं आणि कार्य यांच्यात कमालीचा फरक दिसून येत आहे. एकीकडे सर्व ठिकाणी निर्बंध असतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्यांच्या ‘वेलकम’साठी 40 जणांची टीम तैनात केली जाते. यात जपानचे पंतप्रधान व गव्हर्नर यांचाही समावेश असतो.

मात्र दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱयांवर नियम तोडल्याचा ठपका ठेवला जातो. हे योग्य नाही, असेही मियो मारुमाया म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या