ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू घालणार साधा पोषाख, आयओएने चिनी कंपनी ली निंगचे कीट हटवले

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू नॉन ब्रॅण्डेड म्हणजेच साधे कपडे परिधान करून मैदानावर उतरणार आहेत. कारण हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) ली निंग या चिनी कंपनीचे कीट हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. दुसऱया कुठल्याच कंपनीशी ‘आयओए’ने कीटसाठी अद्याप करार केलेला नाही. ‘आयओए’ने टोकियो ऑलिम्पिकसाठी ली निंग कंपनीचे कीट नुकतेच लाँच केले होते. मात्र हिंदुस्थान-चीन दरम्यानचा सीमावाद चिघळलेला असल्यामुळे ‘आयओए’च्या या निर्णयाविरुद्ध देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे ही कीट हटविण्याचा निर्णय घ्यावा लागला.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही ‘आयओए’ला चिनी कंपनीचे कीट रद्द करण्याचा सल्ला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर चाहते आणि देशवासीयांच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू चिनी कंपनीची कीट घालणार नाहीत, असा निर्णय ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि महासचिव राजीव मेहता यांनी घेतला. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू साध्या पोशाखात उतरतील, असेही त्यांनी सांगितले. मागील गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानी खेळाडूंना बनविण्यात आलेली जर्सी लाँच करण्यात आली होती. ही जर्सी ली निंग या चिनी कंपनीची असल्यामुळे देशभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. सोशल मीडियावर याबद्दल टीकेची झोड उडाली होती. हा प्रचंड विरोध बघून शेवटी ‘आयओए’ला चिनी कंपनीचे कीट रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

खेळाडूंना लस देण्याची जबाबदारी आमची

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या काहीच अंदाज लावता येत नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूला अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्व खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. आतापर्यंत हिंदुस्थानच्या 120 ऑलिम्पियन खेळाडूंना आणि 27 पॅराऑलिम्पियन खेळाडूंना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याचबरोबर 58 खेळाडू व 4 पॅराअॅथलिट यांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. 114 सपोर्ट स्टाफ व प्रशिक्षकांनाही लसीचा पहिला डोस मिळाला असून 37 जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.

नवीन कीट प्रायोजकाच्या शोधात

टोकियो ऑलिम्पिकसाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असला तरी आम्ही ऑलिम्पिक पथकासाठी नवीन कीट प्रायोजक शोधू, असा विश्वास हिंदुस्थान ऑलिम्पिक समितीने व्यक्त केला. ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, खरंतर आमच्याकडे फार कमी वेळ आहे. मात्र तरीही आम्ही कीट प्रायोजकासाठी कोणावर दबाव टाकणार नाही. हिंदुस्थानचे ऑलिम्पिक पथक नवे प्रायोजक असलेल्या कीटमध्ये उतरेल की साध्या पोषाखात हे आम्ही या महिनाअखेरीस स्पष्ट करू, असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानी पथकासाठी दोन ध्वजवाहक

टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाला जेमतेम दीड महिन्याचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे या स्पर्धेत हिंदुस्थानी पथकाचा ध्वजवाहक कोण असेल, याबाबतची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. मात्र ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी पथकासाठी एक पुरुष व एक महिला असे दोन ध्वजवाहक असणार आहेत. या महिनाअखेरीस याबाबतची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत 23 ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या असून यातील 17 स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचा सहभाग होता. प्रत्येक वेळी हिंदुस्थानी पथकासाठी एकच ध्वजवाहक असायचा. मात्र या वेळी दोन ध्वजवाहक असतील. 1920मध्ये हिंदुस्थानने सर्वप्रथम ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.

खेळाडूंनी सरावावर लक्ष केंद्रित करावे

ऑलिम्पिकमध्ये कुठला पोशाख घालायचा, याकडे सध्या खेळाडूंनी लक्ष देऊ नये. तोंडावर आलेल्या ऑलिम्पिकसाठी सध्या सरावावर त्यांनी लक्ष केंद्रित करावे. कोरोनामुळे गेल्या वर्षापासून खेळाडूंचा सरावही विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे इतर गोष्टींमुळे विचलित न होता त्यांनी फक्त सध्या आपल्या सरावाला प्राधान्य द्यायला हवे, असेही ‘आयओए’कडून सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या