पहिल्याच प्रयत्नात गाठली अंतिम फेरी, भालाफेकीत नीरज चोप्राचा पराक्रम

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. नीरजची ही कामगिरी ‘अ’ व ‘ब’ या दोन्ही गटांतून अक्कल ठरली. त्यामुळे 7 ऑगस्टला होणाऱया भालाफेकीच्या अंतिम फेरीकडे तमाम देशवासीयांच्या नजरा असतील.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकून अंतिम फेरी गाठली. ऑटोमॅटिक क्कालिफिकेशनच्या नियमांनुसार पहिल्याच फेरीत थेट अंतिम फेरी गाठल्याने नीरजला पुढील प्रयत्न करावे लागले नाहीत. अ गटामध्ये नीरज 15व्या क्रमांकावर भाला फेकण्यासाठी आला होता. पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये 83.50 मीटरपर्यंत भाला फेकणाऱया किंवा सर्वोत्तम 12 खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. मात्र नीरजने ऑटोमॅटिक क्कालिफिकेशनच्या नियमानुसार अंतिम फेरी गाठल्याने त्याला चिंता करण्याची गरजच उरली नव्हती.

हिंदुस्थान-पाकिस्तान लढत

पाकिस्तानच्या नदीमनेही ‘ब’ गटातून 85.16 मीटर भाला फेकून अंतिम फेरी गाठली. तो या गटात पहिल्या स्थानी राहिला. पहिल्या प्रयत्नात नदीमने 78.50 मीटर भालाफेक केली. मात्र दुसऱया प्रयत्नात त्याने 85 मीटरचा आकडा ओलांडण्यात यश मिळवले. त्यामुळे जपानच्या राजधानीत 7 ऑगस्टला भालाफेक स्पर्धेत हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान लढत बघायला मिळणार आहे. मात्र नीरज व जर्मनीचा जोहानेस केटर यांच्यात खऱया अर्थाने सुवर्ण पदकासाठी लढत रंगणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या