मानसिक स्वास्थासाठी एका कॉलवर होणार समुपदेशन, महाराष्ट्र सरकारने सुरू केला टोल फ्री क्रमांक

482

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या मानसिक स्वास्थावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या एमपॉवरने महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्यासोबत भागीदारी करून नागरिकांना 24×7 उपलब्ध असलेला आणि ‘बीएमसी-एमपॉवर वन ऑन वन’ या नावाने ओळखला जाणारा 1800-120-820050 हा टोल-फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.

महाराष्ट्रातील सर्व शहरांतील नागरिकांना मोफत उपलब्ध असलेल्या या हेल्पलाइनमध्ये अनुभवी आणि प्रशिक्षित मानसिक आरोग्य समुपदेशकांचा मार्गदर्शन करणार आहेत. हे सगळे एमपॉवर – द सेंटर, एमपॉवर- द फाऊंडेशन आणि एमपॉवर – द सेल येथील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट असून ते मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन करतील. ही सेवा मराठी, हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध असेल. ‘बीएमसी-एमपॉवर वन ऑन वन’ या हेल्पलाइनचा प्रसार करून या मोफत सेवेचा महाराष्ट्रातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

‘आजवर कधीही ज्याचा सामना केला नव्हता किंवा ज्याची कल्पनाही केली नव्हती, अशा प्रसंगाला जग सामोरे जात असल्याचा हा काळ आहे. याच्या परिणामी प्रत्येकाला सुरक्षित राहण्यासाठी जबरदस्तीने घरात राहणे गरजेचे आहे. यामुळे अनेकांना कुटुंबाबरोबर वेळ व्यतीत करून नाते दृढ करण्याची दुर्मीळ संधी मिळाली असली तरी जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य, आपल्या नोकऱ्या यामुळे लोकांमध्ये चिंता, निराशेचे वातावरण असेल. यासाठी महाराष्ट्र सरकार अधिक उत्तम मानसिक आरोग्यासाठी श्रीमती नीरजा बिर्ला यांच्या सहकार्याने सुसज्ज अशी हेल्पलाइन सुरू करत आहोत. आमच्या प्रयत्नांमध्ये हातभार लावल्याबद्दल मी त्यांचा आणि एमपॉवरचा आभारी आहे.” असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कोविड-19 साथीच्या काळात, गेल्या महिन्याभरात एमपॉवरला चिंता, तणाव, निराशा, संभ्रमविकृती (पॅरानोइया) यांसारख्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसले आहे. या समस्यांना संबोधित करण्यासाठी एमपॉवर टेलिफोनवरील संभाषणे, ऑनलाइन चॅट, व्हिडिओ कॉलिंग यांसारख्या माध्यमांतून लोकांना या टप्प्यातून पार होण्यासाठी समुपदेशन आणि उपचार पुरवत आहे. त्याचबरोबर एमपॉवर पालक, तरूण व्यावसायिक आणि कुटुंबांना रोजच्या परिस्थितीची अधिक चांगली हाताळणी करण्यासाठी आरोग्यविषयक सल्ले आणि टिप्सही देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या