महिनाभरात टोमॅटो वधारला; किमान 20 रुपये किलो भाव

मागणीअभावी मार्चपासून तीन महिने अवघा तीन ते साडेतीन रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला जूनच्या मध्यापासून चांगला दर मिळू लागला आहे. सध्या नाशिक बाजार समितीत किमान 20 रुपये, तर कमाल 35 रूपये किलो भाव पुकारला जात आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव आणि आवकही कमी आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण परिसर वगळता इतर भागातील टोमॅटो अद्याप बाजारात दाखल झालेला नाही. सध्या नाशिक बाजार समितीत नारायणगाव, संगमनेर येथील टोमॅटो विक्रीसाठी येत आहे, मात्र तो अत्यल्प आहे. कोरोनामुळे मार्चपासून हॉटेल व्यवसाय बंद असल्याने मागणीही घटली आहे.

मागील वर्षी नाशिक बाजार समितीत टोमॅटोची या काळातील आवक 600 क्विंटल व चांगल्या टोमॅटोचा दर 35 ते 50 रुपये किलो होता. सध्या आवक साडेचारशे क्विंटल व दर किमान 20 रुपये, कमाल 35, तर सरासरी 27 रुपये प्रतीकिलो असे आहेत. मार्च महिन्यात टोमॅटोला तीन ते साडेतीन रुपये इतका नीचांकी दर मिळत असल्याने अनेक शेतक्रयांनी टोमॅटोची लागवड केली नाही. आता बाजारात उपलब्ध असलेला कळवणकडील टोमॅटो अवघा दहा टक्के आहे, अशी माहिती कळवण बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या