श्री विठ्ठलाच्या शॉर्टकट दर्शनासाठी भाविकांकडून चार हजार रुपये उकळणाऱ्या सुमित संभाजी शिंदे या फूल विव्रेत्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर शिंदेला मदत करणाऱ्या दोन सुरक्षारक्षकांची मंदिर समितीने हकालपट्टी केली आहे. दरम्यान, सुमित शिंदे हा मिंधे गटाचा पंढरपूर युवा अध्यक्ष आहे. मिंधे गटाकडून ही चिंधीगिरी सुरू असल्याचा संताप वारकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
चेतन रविकांत काबाडी (रा. वाशिम, शहापूर, जिल्हा ठाणे) या श्री विठ्ठलभक्ताने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर सुमित शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पावती न देताच शिंदे गायब
दर्शन करून बाहेर पडल्यानंतर काबाडी यांनी शिंदेचा शोध घेतला. पण तो पावती न देताच गायब झाला होता. सुमित शिंदे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचा पंढरपूर शहर अध्यक्ष आहे. त्याचे फूल विक्रीचे दुकान आहे.
या फसवणूकप्रकरणी मंदिर समितीने अभिजित मंडले आणि शुभम मेटकरी या दोन सुरक्षारक्षकांची हकालपट्टी केली आहे. सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या खासगी संस्थेला नोटीस दिल्याचे मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
माणसी एक हजार घेतले
चेतन काबाडी यांनी मंदिराला देणगी देऊन शॉर्टकट दर्शन मिळते का, याची चौकशी केली असता फूल विक्रेता सुमित शिंदेशी त्यांची भेट झाली. माणसी एक हजार रुपये द्यावे लागतील, असे शिंदेने सांगितले. शिंदेने दर्शन करून आलात की पावती देतो, असे सांगितले. काबाडी यांनी शिंदेच्या फोन-पेवर चार हजार रुपये पाठवले. पैसे जमा होताच शिंदे हा काबाडींसह चारजणांना व्हीआयपी गेटवर घेऊन गेला. सुरक्षारक्षकाला दुरून इशारा केला. सुरक्षारक्षकांनी काबाडींसह चारजणांना दर्शनासाठी सोडले. काही मिनिटांतच दर्शन घेऊन ते बाहेर आले.