
टोरेस ज्वेलरी घोटाळ्याचे मास्टरमाइंड युव्रेनमध्ये असून दोघा सूत्रधारांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, यात एका महिलेचा समावेश आहे. आर्टेम आणि ओलेना स्टोईन अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील सामान्य गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवत त्यांनी कोटय़वधी रुपयांचा गंडा घातला. घोटाळ्याच्या ‘युव्रेन कनेक्शन’ची पोलखोल झाल्यानंतर परदेशातील अनेक संशयित पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
टोरेस ज्वेलरी घोटाळय़ाने मुंबई-महाराष्ट्रासह अन्य राज्यांत खळबळ उडवून दिली आहे. घोटाळ्यात सर्व पैसे गमावल्यामुळे हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. याच अनुषंगाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) घोटाळय़ाच्या कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी तसेच फरार घोटाळेखोरांना अटक करण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. याच तपासात युव्रेनमधील दोघा मास्टरमाइंडचा पर्दाफाश झाला आहे. त्यांना वेळीच अटक करण्यासाठी पोलिसांनी त्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली असून ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे.
जासतोवा 2006 पासून हिंदुस्थानात वास्तव्यास
पोलीस कोठडीत असलेली ‘टोरेस’ची महाव्यवस्थापक जासतोवा 2006 पासूनच हिंदुस्थानात वास्तव्यास आहे. तिला 2008 मध्ये 77 लाखांच्या फसवणूक प्रकरणात अंधेरीतील सहार पोलिसांनी अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता जुन्या गुह्यांच्या फाईल्स वर काढून त्या गैरव्यवहारांच्या तपासाची सद्यस्थिती जाणून घेण्याचे काम हाती घेतले आहे. त्या गैरव्यवहारांची ‘टोरेस घोटाळय़ा’शी कुठपर्यंत लिंक आहे, याचा अधिक तपास सुरू आहे.
कंपनीविरुद्ध 1535 तक्रारी
नरिमन पॉइंट येथील भाजी विव्रेत्याने दिलेल्या तक्रारीनंतर घोटाळा उघड झाला. त्यानंतर टोरेस कंपनीविरुद्ध तब्बल 1535 तक्रारी दाखल झाल्या आहेत. कंपनीने सहा टक्के साप्ताहिक परताव्याचे आमिष दाखवले आणि सुरुवातीला तसे दामदुप्पट पैसे देऊन लोकांचा विश्वास संपादन केला होता. या घोटाळय़ाची व्याप्ती वाढतच चालली आहे.
निवडणुकीवेळी तानियाकडे सापडले होते 69 लाख
विधानसभा निवडणुकीवेळी डोंगरी येथील नाकाबंदीत टोरेसची महाव्यवस्थापक तानिया ऊर्फ तजागुल करक्सानोवना जासतोवा हिच्या कारमधून 69 लाखांची रोख रक्कम जप्त केली होती. मात्र तेव्हा तिच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. तानिया सध्या कोठडीत आहे.





























































