कोयनेत बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बुडालेल्या कराड तालुक्यातील युवकाचा मृतदेह आज तीन दिवसांनी सापडला. संकेत संग्राम काळे (वय 27, रा. रेठरे) असे मृताचे नाव आहे.

जावली तालुक्यातील बामणोली परिसरात संकेत व त्याचे मित्र पर्यटनासाठी आले होते. म्हावशी गावच्या हद्दीत टेन्ट भाडय़ाने घेऊन त्या ठिकाणी ते थांबले होते. मंगळवारी सायंकाळी शिवसागर जलाशयात संकेत बुडाला होता. तेव्हापासून वन विभाग, महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच ग्रामस्थांच्या मदतीने जलाशयात शोधमोहीम सुरू होती. परंतु, काल संध्याकाळपर्यंत त्याचा कसलाही थांगपत्ता लागू शकला नाही. आज सकाळी म्हावशी गावच्या हद्दीत संकेतचा मृतदेह जलाशयाच्या काठाशी मिळून आला.

दुर्घटनेच्या कारणाविषयी संभ्रम

संकेत शिवसागर जलाशयात नेमका कसा बुडाला याबाबत संभ्रमावस्था आहे. काहीजण तो पोहायला गेला होता त्यावेळी बुडाला असे सांगत आहेत, तर काहीजण तो स्पीड बोटीवरून जलक्रीडा करत असताना बोट उलटल्याने बुडाल्याचे सांगत आहेत.