
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील सुमारे 24 नागरिक उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती मिळते. मागील 24 तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ महाविद्यालयातील 1990 च्या दहावी बॅचचे 24 पर्यटक हे 1 ऑगस्ट रोजी मिनीबसने पर्यटनासाठी रवाना झाले. हे सर्वजण 3 ऑगस्ट रोजी हरिद्वार येथे पोहचले. तेथून सोमवारी 4 ऑगस्ट रोजी बारकोट येथे तेथून मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी उत्तरकाशी येथे मुक्कामी होते. मंगळवारी सकाळी गंगोत्री येथे दर्शन झाल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात विजेचे खांब आणि इतर सुविधा विस्कळीत झाल्यामुळे सदर पर्यटक संपर्कात नसल्याचे समजते.
मंचर येथील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी डेहराडून आणि उत्तरकाशी येथील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे मोबाईल बंद येत आहेत. ढगफुटीमुळे उत्तरकाशी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याने संपर्क होत नसल्याचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.
बापू ठेंबेकर, अशोक टेमकर, मारुती शिंदे, माणिक ढोरे, गहिनीनाथ शिंदे, अशोक भोर, तुकाराम गावडे, लीना रोकडे, मंदा वायाळ, अरुणा सातकर, सतीश मेंगडे, सुनिता वाळुंज, मंगल भागडे, सविता काळे, विठ्ठल खेडकर, लीना जंगम, उज्वला पिंगळे, मंदा घाडगे, अनिता भागडे, सुनिता ढेरे, सविता काळे, जनाबाई पवळे यांच्यासह इतर वर्गमित्र मैत्रिणी पर्यटनासाठी गेले होते.
दरम्यान उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, गंगोत्रीतील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत, मात्र ढगफुटीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.