
रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी बहिणीकडे राखी बांधून परतीचा प्रवास सुरू करणारे भाऊ आणि बहिणी शनिवारी कल्याण-शीळ रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडीत सहा तासाहून अधिक काळ अडकून पडले. भोजनाची वेळ उलटून गेली तरी घरी पोहोचता न आल्याने अनेक भावंडांचा सणाचा मूड पूर्णपणे ऑफ झाला. दुसरीकडे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र ठाण्यातून अंबरनाथला हेलीकप्टरमधून उडाले.
शनिवारी अंबरनाथ येथे न्यायालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यायालयातील वरिष्ठ अधिकारी या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळाल्याने काटई-बदलापूर रस्ता आणि कल्याण-शीळ रस्ता मोकळा असेल असा अंदाज अनेकांनी बांधला होता. त्यामुळे अनेक भाऊ-बहिणी वाहनाने एकमेकांकडे रक्षाबंधनासाठी निघाले; परंतु नेहमीप्रमाणेच वाहनांच्या रांगा पाहून प्रवाशांची निराशा झाली. सकाळपासून सुरू असलेली कोंडी दुपारपर्यंत कायम राहिली.