गतवर्षी रेल्वेने दुहेरीकरणासाठी सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत काळी मोरी नाकाचा जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडून उभारलेल्या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी मार्गावरील सर्व वाहतूक पुढील दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे, अशी अधिसूचना जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी काढली आहे.
या पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक टर्नल विभाग, पुणे यांनी काठार पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीसप्रमुखांना पंधरा दिवसांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, वाहतुकीचा तसेच लोकांच्या मागणीचा विचार करून पोलीसप्रमुखांनी 7 ते 16 ऑक्टोबरपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केली.
फलटण व लोणंद बाजूने येणारी अवजड वाहने खंडाळा, शिरवळमार्गे पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाने साताराकडे जातील. साताऱ्याकडून येणारी अवजड वाहतूक पुणे-बंगळुरू महामार्गाने खंडाळा शिरवळ करून लोणंदकडे जाईल. फलटण व लोणंदकरून येणारी सर्व दुचाकी वाहने आदर्की फाटा येथून तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपोडे ब्रुद्रूकवरून वाठार स्टेशनमार्गे साताऱ्याकडे जातील.
सातारा, कोरेगाव येथून लोणंद व फलटणकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने आंबवडे चौक व वाग्देव चौक येथून पिंपोडे ब्रुद्रूकवरून तडवळे संमत वाघोलीवरून लोणंद व फलटणकडे जातील. दरम्यान, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन बस यांना वाग्देव चौक-पिंपोडे ब्रुदूक-तडवळेमार्गे आदर्की फाटा वाहतुकीस परवानगी दिली आहे.