कारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक

31

सामना प्रतिनिधी । मुंबई

सिग्नल तोडून पळणाऱया कारचालकावर कारवाई करण्यासाठी आलेल्या एका वाहतूक शाखेच्या कॉन्स्टेबलचे दोघांनी अपहरण केल्याची घटना छेडानगर येथे घडली. याप्रकरणी कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी त्या दोन्ही तरुणांना अटक करून त्यांची कार जप्त केली आहे.

आज सकाळी छेडानगर जंक्शन येथे एका कारने सिग्नल तोडला. कारमध्ये दोन तरुण होते. सिग्नल तोडून ते ठाण्याच्या दिशेने जात होते, परंतु कॉन्स्टेबल बी. व्ही. मुंढे यांनी कारचालकाला थांबवले. पाऊस पडत असल्याने मुंढे कारमध्ये बसले आणि पावती बनवू लागले. पण त्याचवेळी कारचालकाने गाडी सुरू करून ते मुंढेना पुढे घेऊन जाऊ लागले. धावत्या कारमध्ये स्वतःची सुटका करण्यासाठी मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले. अखेर रमाबाई कॉलनीजवळ त्या तरुणांनी मुंढे यांना कारबाहेर काढले. मुंढे यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. हे कळताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक अमोल आंबवणे व पथकाने लागलीच त्या कारचालकाचा शोध सुरू करून त्याला विक्रोळी हायवेवर त्याला पकडले. कारमधील दोन्ही तरुणांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी टिळकनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या