वाहतूक पोलीस इन अॅक्शन; बॉडी कॅमेराचा वापर करणार

>> मंगेश सौंदाळकर

शहरात वाहतूक कोंडी करणाऱ्यांची आता खैर नाही. बेशिस्त चालकांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांनी येत्या सोमवारपासून सरप्राईज मोहीम हाती घेतली आहे. ऑल ऑफिसर आऊट या मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलीस सरप्राईज विझिट करणार आहेत. या विझिटमध्ये सह पोलीस आयुक्त ते पोलीस शिपाई हे वाहुतकीचे नियम मोडणाऱ्यावर कारवाईसाठी रस्त्यावर असणार आहेत. दिवसातून दोन तास ही सरप्राईज विझिट मोहीम असेल.

मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. बेशिस्त चालकांवर कारवाई करत वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक पोलीस करतात. वाहतूक पोलीस विभागात सुमारे तीन हजार अधिकारी ते कर्मचारी आहेत. सुमारे अडीच हजार पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत असतात.

शहरात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरु आहेत. त्यातच अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत आहेत. काही चालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार होत आहेत. त्याची दखल घेत येत्या सोमवारपासून वाहतूक पोलीस इन अॅक्शन असणार आहेत. मॉल्स, हॉटेल शेजारी वाहने उभी करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी चक्क सह पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक ते पोलीस शिपाई रस्त्यावर असणार आहेत. कारवाईसाठी 1 अधिकारी आणि 10 कर्मचारी यांचे एक विशेष पथक तयार केले जाणार आहे. हे पथक सरप्राईज विझिटमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

पोलिसांना मिळणार बक्षीस
सरप्राईज कारवाईसाठी वाहतूक पोलीस टोविंग व्हॅन, इ चलन मशीन सोबत घेऊनच निघणार आहेत. या मोहिमेत चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिसांना बक्षीस देऊन गौरवले जाणार आहे. कारवाई दरम्यान वाहन चालकाशी सर, मॅडम असे आदराने बोलावे अशा सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

येत्या सोमवार पासून सरप्राईज मोहीम हाती घेतली आहे. कारवाईमुळे वाहतुकीला शिस्त लागेल. वाहतूक पोलीस बॉडी कॅमेराचा वापर करणार आहेत.
यशस्वी यादव, सह पोलीस आयुक्त, (वाहतूक)

आपली प्रतिक्रिया द्या