Bihar News – रुळावरून उतरली अन् थेट शेतात शिरली; वाचा गयामध्ये नेमके काय घडले…

बिहारच्या गया जिल्ह्यात, ट्रेनचे इंजिन नियंत्रणाबाहेर गेल्याने ते रेल्वे रुळावरुन उतरून एका शेतात शिरले. ही घटना गया किऊल रेल्वे मार्गावर शुक्रवारी घडली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वजीरगंज आणि कोल्हाना स्टेशन दरम्यान रघुनाथपूर गावाजवळ शुक्रवारी गया-किऊल रेल्वे मार्गावर एक गाडी रुळावरून घसरली आणि थेट एका शेतात पोहोचली. इंजिन रुळावर धावत असताना अचानक लोको पायलटचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली .

या घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलट लूप लाइनवरून गया जंक्शनच्या दिशेने इंजिन घेऊन जात असताना अचानक इंजिनचे नियंत्रण सुटले. थेट शेतात जाऊन थांबले. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. यावेळी गावाजवळील रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवून शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल केला.