बोट ठेवा विंडोसीट मिळवा; रेल्वेत विंडोसीटसाठीची रेटारेटी-मारामारी संपणार

109
express-crowd-train-station

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लांबपल्ल्याचा विनाआरक्षित ट्रेनमधून प्रवास करताना विंडोसीट किंवा अन्य जागा मिळवण्यासाठी होणारी धडपड, मारामारी आता थांबणार आहे. बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर विनाआरक्षित डब्ब्यांमधून प्रवास करण्यासाठी करण्यात येणार असून त्याचा एक प्रयोग पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी हा पर्याय वापरण्यात येण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेतील प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने महत्वाची पाऊले उचलणार असल्याचे सांगितले होते. अर्थसंकल्पातही रेल्वेचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास याचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. त्याच दिशेने पाऊल उचलले जात असल्याचे दिसत आहे. रेल्वेचे आरक्षित तिकीट न मिळाल्यास किंवा आरक्षित प्रवासाचे दर भरणे शक्य नाही असे प्रवासी विनाआरक्षित डब्ब्यातून बसून प्रवास करता यावा यासाठी ट्रेन सुटते त्या रेल्वे स्थानकावर गर्दी करतात. अनेकदा दिवसरात्र रांगेत उभे राहतात. पण तरी देखील डब्ब्यात बसायला जागा मिळेलच याची शाश्वती नसते. मात्र आता असे होणार नाही, जो पहिला येईल त्याला बायोमॅट्रिक तंत्रज्ञानानुसार पहिली जागा मिळेल. आजतक हिंदीवृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर हे वृत्तप्रसिद्ध करण्यात आले आहे.

अनेकदा रेल्वे स्थानकातील दलाल, शिपाई, हमाल ज्यादा पैसे घेतलेल्या प्रवाशांना आधी डब्ब्यात घुसवतात आणि बाकीच्यांना नंतर प्रवेश मिळतो. असे सर्व प्रकार रोखण्यासाठी आता लांबपल्ल्याच्या ट्रेनने विनाआरक्षित डब्ब्यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना बायोमॅट्रिक मशिनमधून जावे लागणार आहे. या मशीनवर आपल्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो. त्यामुळे गाडी प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर त्या प्रवाशाला अगदी सहज आपल्या जागेवर बसता येईल. जागा पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारे धक्काबुक्की करत डब्ब्यात चढावे लागणार नाही. तसेच एकदा बायोमॅट्रिक क्रमांक मिळाल्यावर तासंतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. गाडीच्या वेळात तुम्ही रेल्वेस्थानकात परतलात की तुम्हाला तुमच्या डब्ब्यात सहज प्रवेश मिळेल.

पुष्पक एक्पप्रेससाठी हा प्रयोग मुंबईच्या रेल्वे स्थानकावर करण्यात आला होता, जो यशस्वी ठरला. त्यानंतर आता अशी सोय लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास यामुळे कमी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या