पोलीस निरीक्षकांची बदली करा; आमदार शिंदे यांचा ठिय्या, कोरेगाव पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव पोलिसांचा मनमानी कारभार सुरू असून, नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तसेच पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ हे राजकीय दबावातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असून, तपासातही पक्षपातीपणा करत असल्याने बल्लाळ यांना निलंबित करावे, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्र्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यातच ठिय्या मारला. अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कोरेगावचे पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत आमदार शिंदे आणि कार्यकर्त्यांनी यापूर्वी दोनवेळा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. अधिवेशन काळात आमदार शिंदे यांनी प्रश्नही उपस्थित केला होता. तरीही कोरेगाव पोलीस व बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नव्हता.

आसरे (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीच्या हद्दीत 9 जानेवारीला गटार योजनेच्या कामामध्ये काही ग्रामस्थांनी अडथळा आणला होता. याच्या पाहणीसाठी गेलेल्या सरपंच सविता सणस, सदस्य रूपेश सपकाळ यांच्यासह अन्य लोकांना मारहाण झाली होती. याप्रकरणी सपकाळ यांनी नऊजणांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, त्यामध्ये काहीही कारवाई न करता कोरेगावचे पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी सरपंच, सदस्यांना मारहाण करणाऱयांकडून 13 जानेवारीला क्रॉस कंप्लेंट घेऊन तक्रार दाखल केली. ही तक्रार खोटी असल्याचा दावा आमदार शिंदे यांनी केला. पोलिसांनी शहानिशा न करता त्यांच्यावर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या होत्या. याबाबत आमदार शिंदे यांनी बल्लाळ यांना जाब विचारला; पण ते समाधानकारक उत्तरे देत नव्हते. अखेरीस बल्लाळ कक्षाबाहेर निघून गेले. त्यानंतर कोरेगावच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री तेरणी यादेखील समाधानकारक उत्तर देत नसल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी येथे आल्याशिवाय आणि बल्लाळ यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही उठणार नाही, असा ठाम पवित्रा शिंदे यांनी घेतला. अखेर दुपारी दोनच्या सुमारास अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी आमदार शिंदे यांनी आसरे येथील कार्यकर्त्यांवर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, बल्लाळ यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली. दरम्यान, कोणावर विनाकारण अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची ग्वाही वैशाली कडूकर यांनी दिली. या आश्वासनानंतर आमदार शिंदे व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

यावेळी साहिल शिंदे, संजना जगदाळे, राजाभाऊ जगदाळे, प्रतिभा बर्गे, ऍड. पांडुरंग भोसले, संजय पिसाळ, अरुण माने, किशोरनाना बर्गे, हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, केशव मदने, अमरसिंह बर्गे, अक्षय बर्गे, जयवंत घोरपडे आदी कार्यकर्ते व आसरे ग्रामस्थ उपस्थित होते.