मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच महत्त्वाच्या विविध खात्यांमध्ये ठिय्या देऊन बसलेले सहसचिव तसेच उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज होलसेल बदल्या झाल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या अधिकाऱ्यांनी बदल्या करून घेतल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालय तसेच गृह विभागातील अधिकाऱ्यांच्या या बदल्यांमुळे उद्याच आचारसंहिता लागण्याचे संकेत मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.
निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धडाधड शासन निर्णय जारी करण्याचा धडाका राज्य सरकारने लावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इतर विभागातील बदल्यांचे आदेश जारी होत होते. पण आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच गृह विभागातील सहसचिव, उपसचिवांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागातील सहसचिव व्यंकटेश भट, मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव कैलाश बिलोलीकर, सचिन सहस्त्रबुद्धे, चंद्रशेखर तरंगे, मनोजकुमार महाले आदींचा समावेश आहे.