ट्रान्सजेंडर ओळखपत्रावर आता ट्रान्सजेंडर्सना पॅनकार्ड काढता येणार आहे. ट्रान्सजेंडर पर्सन कायदा 2019 अंतर्गत जिल्हा मॅजिस्ट्रेटकडून मिळालेले ओळखपत्र पॅनकार्डसाठी वैध दस्तावेज मानले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला दिली. त्यामुळे आता ट्रान्सजेंडर त्यांच्या लिंग ओळखपत्राद्वारे पॅनसाठी अर्ज करू शकतील. यामुळे त्यांना पॅन आणि आधार लिंक करणे सोपे होणार आहे.
ट्रान्सजेंडर रेश्मा प्रसाद यांनी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये, ट्रान्सजेंडर्स पॅन आणि आधार लिंक करू शकतील यासाठी आधार कार्डवर पॅन कार्डवर तृतीय लिंगाच्या वेगळ्या श्रेणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्राला देण्याची मागणी करण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला ट्रान्सजेंडर व्यक्ती कायदा 2019 अंतर्गत जारी केलेले ओळखपत्र आणि लिंग बदल प्रमाणपत्राचा पॅनकार्ड अर्जासाठी वैध कागदपत्रे म्हणून विचार करण्याची सूचना केली होती.
केंद्राने त्यांची सूचना मान्य केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सांगितले की, याचिका प्रलंबित असताना आम्ही सरकारकडून उत्तर मागितले होते. आता सरकारने याचिकेत मांडलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याचे म्हटले आहे.