
सामना प्रतिनिधी । नांदेड
अनेक वर्ष रेल्वेस्थानकाच्या परिसरातील वृक्षावर आपले वास्तव्य करणाऱ्या पक्षांचा निवारा दक्षिण मध्य रेल्वेच्या तुघलकी अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केला आहे. वृक्ष कापण्यासाठी महापालिका, वनविभाग किंवा कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. महिनाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. ही वृक्षतोड पर्यावरणाचे संतुलन बिघडवित आहेच, पण पक्षांचे जीवनही त्यामुळे धोक्यात आले आहे. परंतू रेल्वेच्या या वृक्षतोडीकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
रेल्वेस्थानकाच्या चार क्रमांक प्लॅटफार्मच्या बाहेरील प्रांगणात एक मोठे जांभळाचे आणि निंबाचे झाड होते. हे झाड किमान 70 वर्षापूर्वीचे होते. या झाडावर किमान पाचशे ते सहाशे पक्षी राहत होते. रेल्वे प्रशासनाने विकासाच्या नावाखाली ही झाडे तोडले. त्याबाबत महानगरपालिकेची परवानगीही घेतली नाही. महानगरपालिकेचे उद्यान निरीक्षक मिर्झा फरहत अली बेग यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतू शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी हे ठिकाण रेल्वे पोलीसांच्या अंतर्गत येत असल्यामुळे तेथे तक्रार द्यावी, असे सांगितले. बेग रेल्वे पोलिसांकडे गेले. त्यांनी ही तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला.
रेल्वे प्रशासनाने यापूर्वीही याच प्रांगणात रसायन टाकून झाडे वाळवून ती तोडली होती. या वृक्षतोडीमुळे पक्षांचे प्रजनन थांबते आणि ज्या झाडाची सवय पक्षांना झालेली असते ते झाड तोडल्यानंतर त्यांचा मृत्यू होते. पर्यावरणाची ही हानी भरुन न निघणारी आहे. या वृक्षतोडीची पक्षीतज्ज्ञ सूर्यकांत खंदारे यांनी दखल घेवून दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. आता रेल्वे प्रशासन याची कितपत गंभीर दखल घेते आणि वृक्षतोड करणाऱ्यांविरुध्द काय कारवाई करते, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांचे प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्याकडेही महापालिका दाद मागणार असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नांदेड रेल्वे पोलिसांबाबतही जाब विचारण्यात येणार आहे.


























































