
सामना प्रतिनिधी । मालवण
मुसळधार पावसाने पाच दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढले. रविवारी सहाव्या दिवशी दिवसभर काहीशी विश्रांती घेत पावसाची रिपरिप सुरू होती. सखल भागात पाणी भरले होते. तर अनेक ठिकाणी झाडे तसेच वीज खांब व वीज वाहिन्या कोसळल्याने मोठे नुकसान झाले. अनेक भागातील वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित होता.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला पाठोपाठ मालवण तालुक्याने या हंगामातील नऊशे मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत दिवसभरात ९७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
कोतेवाडा मार्गावर झाड कोसळले
मुसळधार पावसाने काही भागात साचलेल्या पाण्यामुळे अनेक झाडे धोकादायक बनली आहेत. रविवारी सकाळी शहरातील कोतेवाडा मार्गावर भलेमोठे आंब्याचे झाड कोसळले. सुदैवाने झाडाच्या बाजूला असलेले घर बचावले. मात्र एका हॉटेलचे नुकसान झाले. वीज खांब व वीज वाहिन्या तुटल्याने सायंकाळी उशिरा पर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. चिवला बीच मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांनी झाड तोडले. तर वीजवितरण कडून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू होते.
मेढा-राजकोट भागात वीज उपकरणे नादुरुस्त
शनिवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. यात मेढा-राजकोट भागात वीज कोसळली. यामुळे अनेक घरातील वीज उपकरणे नादुरुस्त बनली. यात अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
ओझर येथे शॉक लागून गाय दगावली
ओझर-कातवड येथे गुरांचा कळप चरत होता. जमिनीवर तुटून पडलेल्या वीज भारीत वाहिनीचा स्पर्श होऊन विजेचा धक्का बसल्याने शेतकरी मंगेश मधुकर चव्हाण यांची गाय दगावल्याची घटना रविवारी सकाळी घडली. प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. शेतकरी चव्हाण यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.


























































