लोकासांगे ब्रम्हज्ञान, वन विभागाचीच झाडे पाण्याअभावी जळाली

24

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

शासन वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देत असताना वृक्ष लागवडीचे काम करणाऱ्या वन विभागाची झाडे पाण्याअभावी जळून गेली असल्याची घटना समोर आली आहे. वृक्ष संवर्धन करा असे उपदेशाचे डोस पाजणारे वन खाते लोकांसागे ब्रम्हज्ञान स्वत मात्र कोरडे पाषाण या म्हणीची अमलबजावणी करीत आहे.

मागील काही वर्षा पासून वाढत्या उष्णतेचे उच्चांक निर्माण होत आहेत. कमी झालेली जंगले व वृक्षांची बेसुमार कत्तल होत असल्याने जागतिक पातळीवर हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळेच महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्ष योजना जाहीर केली असून याची सर्वस्तरातून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात तर वृक्ष लागवडीचे महत्व खर्‍या अर्थाने जनतेला पटले असल्यानेच सामान्य नागरिक ते सामाजिक संस्था वृक्षारोपण करत असून झाडे जगविण्याची धडपड करीत आहेत. परंतु पंढरपूर तालुक्यात वन विभागाकडूनच वृक्ष जोपासण्याला हर्ताळ फासला जात आहे. तालुक्यातील कासेगाव हद्दीत वन विभागाची मोठी जमिन असून यावर विविध जातीचे वृक्ष लावण्यात आले आहेत. परंतु सध्या पाण्या अभावी या जंगलातील वनराई जळून गेली आहे. या जंगलातील जवळपास सर्व झाडांवर एकही हिरवे पान पहायला मिळत नाही. ही झाडे जगविण्यासाठी वन अधिकार्‍यांकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या