‘हे’ दांम्पत्य करतात फर्निचरची शेती!

फर्निचरच्या वस्तू बनवण्यासाठी सुमारे 50 वर्षे जुने वृक्ष कापून त्यापासून विविध वस्तू बनवण्यात येतात. मात्र, यासाठी झाडांची कत्तल होते. मनुष्यबळ आणि पैसाही खर्च होतो. हे टाळण्यासाठी वृक्ष कापण्याऐवजी वृक्ष फर्निचरच्या आकारातच वाढवले तर खर्च, वेळ आणि मनुष्यबळही वाचते. त्यामुळे इंग्लंडमधील गेविन आणि एलिस मुनरो या दांम्पत्याने फर्निचरची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत.

या दांम्पत्याने आतापर्यंत अशाप्रकारे 50 टेबल, 100 लँप आणि 250 खुर्च्या तयार करून त्याची विक्री केली आहे. या फर्निचरला बाजारात चांगली मागणी आहे. वृक्ष फर्निचरच्या आकारात वाढवण्याच्या कामाची सुरुवात गेविन यांनी 2006 मध्ये केली होती. त्यावेळी प्रायोगिक तत्वावर त्यांनी मोजक्याच खुर्च्या बनवल्या होत्या. त्यात यश आल्यानंतर त्यांनी हे काम वाढवले. 2012 मध्ये गेविन यांनी एलिसशी लग्न केले. या प्रयोगाला यश मिळत असल्याने त्यांनी कंपनी सुरू करून या कामाला व्यावसायिक स्वरुप दिले. मात्र, पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात हा प्रयोग केल्याने त्यांना अपयश आले. अपयशाची कारणे शोधून त्यावर मात करत आता त्यांनी हा व्यवसाय यशस्वी केला आहे.

furnitue-farm-2

एका ठिकाणी बोन्साय पाहिल्यानंतर आपल्याला ही कल्पना सुचल्याचे गेविन यांनी सांगितले. ते बोन्साय एका खुर्चीच्या आकाराचे दिसत होते. तेव्हा वृक्ष अशा पद्धतीनेच उगवण्याचा निश्चय केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, एका वृक्षाला फर्निचरचा आकार देण्यास खूप वेळ द्यावा लागतो. वृक्षांच्या फांद्या फर्निचरच्या आकारात फिरवाव्या लागतात. त्यासाठी वृक्षांची योग्य वाढ होईपर्यंत थांबावे लागते. हे खूप कौशल्याचे काम असल्याचे गविन यांनी सांगितले. खुर्ची बनवण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा वेळ लागतो. त्यानंतर वृक्षाच्या फांद्या सुकण्यासाठीही तेवढाच वेळ लागतो. त्यानंतर या फर्निचरची विक्री करण्यात येते. अशा प्रकारे बनवण्यात आलेल्या खुर्चीची किंमत आठ लाखांच्या घरात आहे. तर टेबलासाठी 11 लाख रुपये मिळतात. तर लँप 80 हजार रुपयात विकले जातात. हे फर्निचर टिकाऊ असल्याने त्याला चांगली मागणी असल्याचे गेविन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या