आदिवासी आश्रमशाळांना मिळणार विज्ञान शिक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक चालना मिळणार आहे.

राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत 502 शासकीय व 556 अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांपैकी 121 शासकीय आश्रमशाळा व 154 अनुदानित आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिकच्या (11 वी 12 वी) कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यात येत आहेत. आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिक स्तरावर विज्ञानशाखेला प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित असे विषय असून या शाखेसाठी तीन पदे मंजूर आहेत. एकाच विषयातील पदव्युत्तर पदवी असताना उच्च माध्यमिकच्या एका शिक्षकाला विज्ञान शाखेचे दोन विषय शिकवावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत होता. याचा विचार करून सुधारित आश्रमशाळा संहितेनुसार आकृतिबंधामध्ये सुधारणा करून विज्ञान शाखेसाठी चार शिक्षकांची तरतूद करण्याचा आज निर्णय घेण्यात आला.