आदिवासी विकास महामंडळाच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार

आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील भात (साळ) नाशिकऐवजी गुजरातमध्ये नेऊन भरडाई करून कोट्यवधी रुपयांच्या तांदळाची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री सुरगाण्यातील नागरिकांनी पाठलाग करून गुजरातमध्ये ट्रकचे चित्रीकरण केले आहे. महामंडळाकडे हे पुरावे पोहोचले असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शासनाच्या धान खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने नाशिक जिह्यातून तेवीसशे रुपये प्रतीक्विंटलने 1 लाख 65 हजार 540 क्विंटल भात (साळ) खरेदी केली आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्याचे 38 कोटी रुपये दिले आहेत. या भाताची चाळीस रुपये प्रतिक्विंटलने भरडाई करून त्याचा तांदूळ तयार करण्याचे कंत्राट तीन मिलला दिले आहे, यात नाशिक जिह्यातील दोन आणि जळगावातील एका मिलचा समावेश आहे. भात भरडाई करून त्याचा 67 टक्के तांदूळ हा जिल्हा पुरवठा खात्याच्या गोदामात जमा करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. महामंडळाच्या गोदामातील या भाताची भरडाई नाशिक जिह्यात न करता तो थेट गुजरातमध्ये नेला जात असल्याचे मागील महिन्यात उघड झाले होते. मात्र, हे प्रकरण त्यावेळी दडपण्यात आले.

सुरगाणा ते गुजरात ट्रकचा पाठलाग

सुरगाण्यातील बाऱ्हे येथील गोदामातून गुरुवारी मध्यरात्रीनंतर भाताचे पोते भरून दोन ट्रक निघाले. नाशिकऐवजी ते गुजरातकडे गेले, यामुळे दोन स्थानिक तरुणांनी मोटारसायकलवर सुमारे सत्तर किलोमीटर या दोन्ही ट्रकचा पाठलाग केला. मोबाईलमधून त्यांचे चित्रीकरण केले. जिओ टॅगींगद्वारे गुजरातच्या वासदा येथील एका पेट्रोलपंपावर आणि उनई येथे या दोन्ही ट्रकचे पह्टो काढले. आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पुरावे शुक्रवारी सकाळी पाठविले. ‘संबंधित फोटो आम्हाला प्राप्त झाले आहेत, त्याची चौकशी सुरू आहे’, अशी माहिती महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक रोहित बनसोडे, तसेच विपणन विभागाचे उपमहाव्यवस्थापक विजेंद्र गोसावी यांनी दिली.

पुरवठा खात्याचा संबंध

भात खरेदी करून गोदामात ठेवणे इतकीच आमची जबाबदारी आहे. कंत्राटदाराने गोदामातून भात उचलून मिलमध्ये नेऊन भरडाई करणे, 67 टक्के उताऱ्याप्रमाणे तांदूळ पुरवठा विभागाच्या गोदामात जमा करणे, याची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची आहे, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

1 लाख क्विंटलची उचल

खरेदी केलेल्या एकूण 1 लाख 65 हजार 540 क्विंटल भातापैकी संबंधित कंत्राटदाराने महामंडळाच्या गोदामातून आतापर्यंत एक लाख क्विंटलची उचल केली आहे, त्याचा हिशेबही देऊन टाकला आहे. यातील पुरवठा खात्यात प्रत्यक्ष तांदूळ किती जमा झाला, याबाबतचे गौडबंगाल कायम आहे.