
टुकार कामामुळे सुधागड तालुक्यातील घोडगाव, गावठेवाडी, नवेवाडी, भागाची वाडी, ओवळ्याच्या वाडीला जोडणारा रस्ता पावसात वाहून गेला असून रुग्णांना झोळी करून शहरातील रुग्णालयामध्ये न्यावे लागत आहे. मात्र इतकी भयंकर परिस्थिती असताना प्रशासन ढिम्म असल्याने संतप्त झालेल्या शेकडो आदिवासींनी तहसील कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. नुसती आश्वासने नको.. हक्काचा रस्ता द्या नाहीतर मरण द्या अशा जोरदार घोषणांनी यावेळी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
पाली या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या वाड्यांवर नागरी सुविधांचे विघ्न असल्याने आदिवासींना रोजच नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याबाबत प्रशासन लक्ष देत नसल्याने आदिवासी बांधवांनी चिखलगाव ते घोडगाव या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेसह वाड्यांमधील अनेक नागरी समस्यांबाबत पाली तहसील कार्यालयावर धडक देत निवासी नायब तहसीलदार भारत फुलपगारे यांना निवेदन दिले.
…तर निवडणुकांवर बहिष्कार
सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेचे अध्यक्ष गोविंद लेंडी उपाध्यक्ष चंद्रकांत वरगुडे, ताया सिंगवा, मारुती डोके, महादू दोरे, धर्मा सिंगवा, चाऊ सिंगवा, परशुराम दोरे, चंद्रकांत सिंगवा, सुभाष सिंगवा, जानू सिंगवा, अनंता सिंगवा, जानू मेंगाळ आदी ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी आमच्या समस्यांचे तत्काळ निवारण करावे अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला.

























































