
मोठ्या डौलात फडकत असतो.. आकाशात! उर आणि मन भरून येते… आत्यंतिक अभिमानाने! आपले स्वातंत्र्य.. स्वाभिमान.. स्वत्त्व .. सारेच जपत असतो तो.. आपली देशाची सभ्यता, बहुरंगी.. अत्यंत सुसंस्कृत संस्कृती, विविधता, एकात्मता सारे काही त्याच्या ठायी एकवटले आहे. आणि आपण अगदी आश्वस्त असतो त्याच्या छायेखाली.. अगदी परदेशातसुद्धा. आपला तिरंगा.! हिंदुस्थानी राष्ट्रध्वज. हा ध्वज लावण्याचे, उभारण्याचे, तयार करण्याचे, हाताळण्याचे सगळ्याचे नियम असतात. आणि ते उल्लंघन केल्यास दंड ते शिक्षा होऊ शकते.
जाणून घेऊया आपल्या तिरंग्याविषयी ..
१) आपला राष्ट्रीय ध्वज हा चार रंगानी बनलेला आहे, भगवा, पांढरा , हिरवा आणि गडद निळा. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगा हिंदुस्थानचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला गेला. चेन्नईच्या पिंगाली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:३ असे आहे. तसेच ध्वज खादीच्या किंवा रेशमी कापडाचा असावा असा नियम करण्यात आला.
२) भगवा रंग म्हणजे त्याग , आपल्या नेत्यांनी भौतिक फायद्यासाठी उदासीन असणे अपेक्षित आहे, मध्यभागी पांढरा म्हणजे शांतता, सत्य आणि प्रकाश, जो आपल्याला आचरणासाठी मार्गदर्शन करतो. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक, मातीशी नाते दाखविणारा. अशोक चक्र कायद्याचे चाक आणि धाक आहे. या ध्वजाखाली काम करणाऱ्याचे नियंत्रण तत्व या अशोक चक्रात आहे. चाक गती दर्शविते, सतत बदलाची गतिशीलता म्हणजे अशोक चक्र.
३) आपला तिरंगा हा लोकर, खादी किंवा रेशमी वस्त्रापासून तयार केलेला असावा. प्रत्येक रंग त्याच्या ठरलेल्या जागीच असायला हवा. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तिरंगा फडकावत येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. शासकीय आदेशानुसारच शासकीय इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणता येतो.
4) तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. त्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याबद्दल कोणीही अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
५) तिरंग्याचा व्यावसायिक वापर केला जाऊ नये. एखादी व्यक्ती कमरेखालील वस्त्रासाठी तिरंग्याचा वापर करीत असेल तर तो अपराध आहे. तिरंग्याचा अपमान आहे. किंवा मृतदेहाभोवती (शहीद जवान वगळून) तिरंगा लपेटत असतील तर तो तिरंग्याचा अपमान आहे. तिरंग्याचा रुमाल किंवा कोणतेही मानवी वस्त्र म्हणून उपयोग करता येणार नाही.
६) तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी म्हणजे राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता.
७) टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी , पडदा म्हणून वापर करण्यासाठी सक्त मनाई आहे.
८) फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहिला पाहिजे. फाटलेला,मळलेला किंवा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये.
९) तिरंगा एखाद्या मंचावर फडकावलेला असल्यास वक्ता भाषण करताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.
१० ) अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्याबरोबरीने लावले जाऊ नये.


























































